आक्रमक विरोधकांचा सरकारला सवाल : विरोधकांची हौदाकडे धाव, कामकाज तहकूब
पणजी : जुने गोवेत जागतिक वारसा स्थळाच्या केवळ 100 मीटर परिघात बांधण्यात आलेल्या वादग्रस्त ‘शायनिंग’ बंगल्याच्या मुद्यावरून सोमवारी विधानसभेत चांगलेच वादंग माजले. विरोधी गटातील सर्व सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर धाव घेत, ‘एवढा विरोध होत असतानाही तो बंगला अद्याप पाडण्यात का येत नाही’?, असा सवाल केला. मात्र विरोधकांच्या या कृतीला ‘उद्याच्या हेडलाईनसाठीचे नाटक’ असे लेबल लावत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी करून विषयाला वळण देण्याचे प्रयत्न केले. त्याचबरोबर त्या विषयाच्या ‘न्यायप्रविष्टतेची’ ढाल वापरण्याचाही प्रयत्न केला. प्रत्यक्षात मूळ प्रश्न जुने गोवेत बेसिलिका चर्चचा परिसर बफर झोन म्हणून अधिसूचित करण्याच्या मागणीचा होता. ऊडाल्फ फर्नांडीस यांनी तो मांडला होता. परंतु या बंगल्याच्या भानगडीत तो बाजूलाच राहिला व वादंग माजले.
ऊडाल्फ यांनी बेसिलिका चर्चसह जुने गोवेतील धार्मिक स्थळांच्या परिसराचा मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा. त्याकामी टीसीपी खात्याच्या सहभागासह स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे, जाणकार व तज्ञांची मदत घ्यावी, आदी मते अन्य अनेक मागण्या, सूचना मांडल्या होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे, या परिसरातील चर्चसह विविध धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने या स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना ‘ड्रेस कोड’ ची सक्ती करण्यात यावी, अशी महत्वपूर्ण मागणीही त्यांनी केली होती. त्यावर बोलताना समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी तुमच्या बहुतेक सर्व सूचना आणि मते सरकारने विचारात घेतली असून बफर झोन अधिसूचित करण्यात आला असल्याचे सांगितले. त्याशिवाय या परिसरात बांधकामे येऊ नयेत यादृष्टीने कायदेही करण्यात आल्याचे ते म्हणाले.
मात्र मंत्र्यांच्या याच वक्तव्यावरून सभागृहात वादाची ठिणगी पडली व विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कडक भूमिका घेताना मंत्र्यांचे सदर दावे आणि आश्वासने पोकळ असल्याची टीका केली. सध्यस्थितीत या भागात तब्बल 54 बांधकामे अनधिकृत असल्याचे स्पष्ट असताना मंत्री खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यातून थेट त्या बंगल्याचा मुद्दा उपस्थित झाला व सरकारने जर एवढे कडक कायदे केलेले आहेत, तर केवळ 100 मीटर परिसरात ‘तो’ बंगला कसा उभा राहिला, असा सवाल उपस्थित केला.
मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हा आरोप खोडून काढण्याचे केविलवाणे प्रयत्न केले. मात्र त्यांना न जुमानता विरोधक आपल्या दाव्यावर ठाम राहिले. त्यातून सभागृहात प्रचंड गदारोळ माजला व सर्व विरोधक सभापतींच्या आसनाच्या दिशेने धावले. मुख्य म्हणजे विजय सरदेसाई यांनीही त्यांना साथ दिली. त्यावेळी सर्व विरोधकांनी ‘शेम शेम’ च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. सभापतींनी त्यांना आवरण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु त्यांचा हा अवतार पाहता ते माघार घेणार नाहीत, असे स्पष्ट होताच त्यांनी कामकाज दहा मीनिटांसाठी तहकूब केले.
त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताक्षणीच सर्व विरोधक आपापल्या आसनाकडेच उभे राहिले व हाती निषेधाचे फलक उंचावून त्यांनी बंगल्याचा विषय पुन्हा उपस्थित केला. बंगल्यावर कारवाई कधी करणार ते सांगा, असा एकच घोषा विरोधकांनी लावून धरला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांनीही उभे राहून त्यांना अडविण्याचे प्रयत्न केले. मंत्री फळदेसाई यांचे लक्ष विजय सरदेसाई यांच्याकडे गेले असता त्यांनी हातातील फलक खाली धरला असल्याचे त्यांना दिसून आले. त्याही परिस्थितीत त्यांच्यातील विनोदबुद्धी जागी झाली व ‘विजय सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभे आहेत का?’ असे विचारून त्यांनी हळूच त्यांना चिमटा काढण्याची संधी घेतली. या वादविवादात प्रश्नोत्तर तासाचा निम्मा अवधी खर्ची पडला. तरीही तो संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेवटी सभापतींनी प्रश्नोत्तर तासाला पूर्णविराम दिला व शुन्य प्रहराची घोषणा केली.









