प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणूक पुन्हा लांबणीवर : महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या चार स्थायी समित्यांची निवडणूक 8 ऑगस्टला होणार होती. मात्र सदर निवडणूक प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णावर यांनी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.12 ऑगस्टला ही निवडणूक निश्चित करण्यात आली असून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कौन्सिल विभागाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली होती. पण पुन्हा निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. महापालिकेच्या चारही स्थायी समित्यांचा कार्यकाळ 30 जूनला पूर्ण झाला आहे.
याआधी प्रादेशिक आयुक्तांनी स्थायी समिती निवडणूक वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार 2 जुलैला निवडणूक होणार होती. पण नगरसेवक अपात्रता प्रकरणामुळे ऐनवेळी 2 जुलैची निवडणूक रद्द करण्यात आली. त्यानंतर स्थायी समितीची निवडणूक व्हावी, यासाठी महापौरांना पत्र दिले होते. मनपाच्या कौन्सिल विभागाकडून निवडणुकीचा फेरप्रस्ताव प्रादेशिक आयुक्तांना पाठविण्यात आला. पण त्यावरही कार्यवाही न झाल्याने महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी व सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी स्थायी समिती निवडणूक घेण्याबाबतचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांना दिले होते. त्यानंतर लागलीच दोन दिवसांतच प्रादेशिक आयुक्तांकडून स्थायी समितींची निवडणूक जाहीर करण्यात आली.
त्यानुसार 8 ऑगस्टला निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली. निवडणुकीची नोटीस कौन्सिल विभागाकडून नगरसेवकांना पाठविण्यासह सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र 8 ऑगस्टची निवडणूक पुढे ढकलून ती 12 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून कौन्सिल विभागाला सोमवार दि. 4 रोजी कळविण्यात आले आहे. निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने कौन्सिल विभागाने केलेले सर्व नियोजन कोलमडले आहे. आता पुन्हा 12 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी कौन्सिल विभाग कामाला लागला आहे. महापालिकेच्या 12 व्या कार्यकाळासाठी चार स्थायी समित्यांची निवडणूक 12 ऑगस्टला होणार आहे.
सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत चारही स्थायी समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. दुपारी 3 वा. प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होईल. त्या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सुरुवातीला सदस्यांची हजेरी, बैठकीसाठी कोरम पूर्ण झाला आहे की नाही याची खात्री केली जाईल. त्यानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची पडताळणी, वैध उमेदवारी अर्जांची माहिती जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. आवश्यकता भासल्यास मतदान घेऊन निकाल जाहीर केला जाईल. दोनवेळा स्थायी समित्यांची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने नगरसेवकांत जोरदार चर्चा रंगली आहे.









