कराड / देवदास मुळे :
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कराडचे शिवराज मोरे यांची निवड झाली. दिल्लीहून त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी युवकच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी लावलेल्या एका फलकाची सर्वत्र चर्चा झाली, ‘विरासत से अवसर मिलता है, कर्तृत्व सिद्ध करना पडता है’ असा आशय असणाऱ्या फलकातच शिवराज मोरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या गवसणीचे मर्म दडलेले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे संघटनेत सक्रीय झाल्यानंतर त्यांनी सुरूवातीला एनएसयुआय आणि युवक काँग्रेसची जबाबदारी मागून घेतली. या संघटनेत नेत्यांच्याच मुलांचा भरणा होता. त्यामुळे ‘काँग्रेस में अब सिलेक्शन नही, इलेक्शन होगा’ असे सांगत त्यांनी विद्यार्थी व युवकमध्ये जो संघटना बांधल, त्याला पद हे धोरण राबवले. या धोरणाचा परिपाक म्हणजे शिवराज मोरे यांनी मिळवलेले युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद असल्याचे मानले जात आहे.
बापूसाहेब मोरे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद का महत्वाचे तर हे पद यापूर्वी शरद पवार, उल्हास पवार, विश्वजित कदम, सत्यजित तांबे, दिवंगत राजीव सातव या नेत्यांनी भुषवले आहे. शिवराज मोरे हा कराडचे माजी नगरसेवक यांचा मुलगा. त्यांच्या आजीही नगरसेविका होत्या. या पलिकडे काहीही राजकीय पार्श्वभूमी या कुटुंबास नाही. शिवराज मोरे पुणे विद्यार्थी गृह येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते, त्यावेळी २००८ साली त्यांनी पुण्यात एनएसयुआयचे शाखाध्यक्ष पद घेतले होते. त्यांची संघटनेतील चुणूक पाहून २००९ साली राज्य सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याच्या दृष्टीने पावले टाकली. त्यावेळी विद्यार्थी काँग्रेस आणि युवकमध्ये वरिष्ठ नेते, मंत्र्यांचीच मुले पदावर असायची. मात्र राहुल गांधी यांनी सर्वसामान्य कार्यकर्ते पुढे आणण्यासाठी ‘काँग्रेस में अब सिलेक्शन नही, इलेक्शन होगा’, असे सांगत संघटना बांधणारांनाच यापुढे संधी मिळेल, असा निर्णय घेतला.
या धोरणानुसार २०१० साली एनएसयुआयच्या संघटनात्मक निवडणुका महाराष्ट्रात जाहीर झाल्या. त्यासाठी सदस्यांची नोंदणी करून निवडणूक लढवायची होती. त्यावेळी शिवराज मोरे यांनी प्रथम वडील बापूसाहेब मोरे यांच्याशी चर्चा करून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मोरे यांनी राज्यभर संघटनात्मक बांधणी सुरू केली. सदस्य नोंदणी केली. या निवडणुकीत नेते, मंत्र्यांची मुले प्रतिस्पर्धी असताना शिवराज मोरे प्रदेशाध्यक्ष पदी विजयी झाले. या निवडणुकीतून सामान्य कुटुंबातील युवक विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचला. मोरे यांनी देशपातळीवर लक्ष वेधून घेतले. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतही ते प्रदेशाध्यक्षपदी विजयी झाले.
त्यांचा वरिष्ठ नेत्यांशी संपर्क प्रस्थापित झाला. संघटनेच्या कामातील रस पाहून मोरे यांना २०१५ साली एनएसयुआयच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. २०१९ साली युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची संधी देण्यात आली. त्यानंतर प्रदेश उपाध्यक्षही केले.
युवक काँग्रेसमध्ये सक्रीय होताना २०२१ साली युवकच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणुका लागल्या. त्यावेळी तत्कालीन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत आणि शिवराज मोरे यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी लढत झाली. त्यावेळी राज्यभर नोंदणी करून निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत राऊत हे विजयी झाले. तर शिवराजना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. राऊत प्रदेशाध्यक्ष तर मोरे हे उपाध्यक्ष झाले. पुढे त्यांना कार्याध्यक्ष केले. संघटनात्मक काम पाहून मोरे यांना अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्षपदी संधी दिली.
- पदभार स्वीकारताच महाराष्ट्रात दौरा
या निवडीचे पत्र दिल्लीत मोरे यांना दिले. त्यानंतर ते नागपूरला आले. तेथे त्यांचे जोरदार स्वागत केले. तेथून त्यांनी आपला दौरा सुरू केला. दुसऱ्याच दिवशी ते गडचिरोलीला गेले. तेथेही त्यांचे स्वागत केले. शिवराज मोरे यांच्या निवडीने सामान्य कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. ‘राजा का बेटा अब राजा नही बनेगा, वही बनेगा जो काबिल होगा’, याचा शिवराज मोरेंच्या निवडीने प्रत्यक्षात येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे.








