आमदार विठ्ठल हलगेकर यांना युवा समितीचे निवेदन
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने सीमाभागात सुरू असलेली कन्नडसक्ती तातडीने थांबवावी, अशा आशयाचे निवेदन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची खैरवाड येथे एका कार्यक्रमात भेट घेऊन देण्यात आले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी कन्नडसक्ती करण्यात येत असल्याने मराठी भाषिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच आपण स्वत: मराठी भाषिक आहात, त्यामुळे या कन्नडसक्तीचा मनस्ताप आपणालासुद्धा होणार आहे. त्यामुळे आपण हा कन्नडसक्तीचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा, अशी विनंती केली.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांना मागील निवेदनाची आठवण करून देत खानापूर येथे नव्याने झालेल्या बसस्थानक, इस्पितळ व हेस्कॉम कार्यालयावर कन्नड भाषेसह मराठीत फलक बसविण्यात आले नसल्याने मराठी भाषकांची गोची होत आहे. यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सीमाभागात मराठी भाषिक अल्पसंख्याक आहेत. भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निर्देशानुसार 15 टक्के भाषिकांना त्यांच्या भाषेत शासकीय व्यवहार करण्याचे अधिकार आहेत. कायदेशीर हक्क असताना कर्नाटक सरकार कन्नडसक्ती लादून मराठी भाषा संपविण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आपण मराठी भाषिक आमदार असल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निदर्शनास आणून मराठी भाषिकांना न्याय द्यावा, असे आवाहन यावेळी युवा समितीच्यावतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांना करण्यात आले.
कार्यवाही करण्याचे आश्वासन
यावेळी विठ्ठल हलगेकर यांनी आश्वासन देताना मी स्वत: मराठी भाषिकांच्या मतांमुळे निवडून आलो आहे. त्यामुळे कन्नडसक्ती थांबली पाहिजे, याच मताचा मी ही आहे. आपण मराठी वाचविण्यासाठी कार्य करत आहात याचा अभिमानही आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याचे विनंती करतो, असे आश्वासन दिले. यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, पिराजी मुंचडीकर, चंद्रकांत पाटील, नारायण मुचंडीकर यांच्यासह मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









