बेळगाव : फोर्ट रोडनजीक ए. के. देशपांडे रोडवर बेकायदा बांधण्यात आलेल्या शेडवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हातोडा फिरविला आहे. सोमवार दि. 4 रोजी महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. मात्र कारवाईदरम्यान जोरदार विरोध झाल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तरीदेखील पथकाने शेड पाडून त्या ठिकाणी महापालिकेची नोटीस चिकटवली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सीटीएस नंबर 879 आणि 880 नजीकच्या सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे, अशी तक्रार विनोद कंग्राळकर राहणार ए. के. देशपांडे गल्ली यांनी 1 जून 2023 रोजी महापालिकेकडे केली होती.
त्यानुसार महापालिकेकडून भूदाखले विभागाच्या साहाय्यक संचालकांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर भूदाखले विभागाकडून सदर रस्त्याचे मोजमाप करून हद्द निश्चित करण्यात आली. तसेच साहाय्यक अभियंते दक्षिण उपविभाग 2 यांनीदेखील रस्त्याची पाहणी करून अहवाल दिला. त्यानुसार केएमसी अॅक्ट 1976 कलम 288 (डी)नुसार महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी ए. के. देशपांडे रोडवरील अनधिकृत शेड पाडविण्याचा आदेश बजावला होता. त्यानुसार महापालिकेच्या महसूल व अतिक्रमण हटाव निर्मूलन पथकांकडून सोमवारी सदर शेड हटविण्यात आले.









