सातारा :
डीजे तथा साऊंड सिस्टिममुळे सामाजिक, मानसिक आरोग्य ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला, लहान मुलांचे बिघडते. त्यामुळे येवू घातलेल्या गणेशोत्सवामध्ये डीजेला पुर्णपणे बंदी आणावी, तसे धोरण जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावे, आठ दिवसात आपला निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, अन्यथा सातारा शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध नोंदवू असा एल्गार ज्येष्ठ नागरिक संघटनेने दिला आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक संघटनेने दिलेल्या आक्रमक इशाऱ्यानुसार जिल्हा प्रशासन कार्यवाही करणार काय याकडे लक्ष लागून राहिले आहे.
निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव जवळ येवू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहु कला मंदिर येथे बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत डीजेबाबत मोघम चर्चा झाली. आवाज कमी करावा अशी सूचना देण्यात आली. परंतु डीजेमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. ज्येष्ठांना त्रास होतो. महिलांना त्रास होतो. लहान मुलांना त्रास होतो. रुग्णांना त्रास होतो. असे असल्याने डीजे हा बंद झाला पाहिजे. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, ठोस भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आठ दिवस मुदत देतो आहोत. तोपर्यंत जर कार्यवाही केली नाही तर आम्ही शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढून निषेध नोंदवू असा इशारा दिला आहे.








