वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय पुरुष हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार हॉकी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने सोमवारी 24 सदस्यांचा संघ जाहीर केला. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 15 ऑगस्टपासून पर्थमधील सामन्याने प्रारंभ होत आहे.
राजगीर येथे 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महत्त्वाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाला सरावाच्या हेतूने हॉकी इंडियाने हा ऑस्ट्रेलिया दौरा आयोजित केला आहे. राजगीरमध्ये होणारी आशिया चषक हॉकी स्पर्धा आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठीची पात्र फेरीची म्हणून राहील. ऑस्ट्रेलियामध्ये सरावाच्या सामन्यातून भारतीय हॉकीपटूंच्या शारीरिक तंदुरुस्ती आणि तांत्रिक समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. भारतीय हॉकी संघाला प्रमुख प्रशिक्षक क्रेग फुल्टॉन यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघामध्ये गोलरक्षक कृष्णन पाठक, सुरज करकेर, बचाव फळीत सुमित, जर्मनप्रित सिंग, हरमनप्रित सिंग (कर्णधार), संजय, अमित रोहिदास, निलम संजीव झेस, जुगराज सिंग, सी. पुवन्ना मध्यफळी : राजेंद्रसिंग, राजकुमार पाल, हा|िदक सिंग, मनप्रित सिंग, विवेक सागर प्रसाद, रविचंद्र सिंग, विष्णुकांत सिंग, आघाडी फळी : मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा, अभिषेक, सुखजित सिंग, दिलप्रित सिंग, सेल्व्हम कार्ती आणि आदित्य लालगे.









