सेन्सेक्स 418 अंकांनी तेजीत : धातू, ऑटो समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात तेजीसह झाली आहे. धातू आणि ऑटो समभागांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स 418 अंकांनी वाढत बंद झाला.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समाभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 418 अंकांनी वाढत 81,018 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 157 अंकांनी वाढत 24,722 अंकांवर बंद झाला.
विविध निर्देशांकांची कामगिरी पाहता धातू, रिअल्टी, ऑटो, डिफेन्स आणि आयटी निर्देशांकाने तेजी राखली होती. आयटी समभाग सुरुवातीच्या बाजारातील सत्रात दबावामध्ये पाहायला मिळाले. अखेर हा निर्देशांक सावरत 553 अंकांनी वाढत बंद झाला. त्यात मिडकॅप निर्देशांक सुद्धा जवळपास 502 अंकांनी वाढलेला होता. बँक निफ्टी निर्देशांक सपाट स्तरावर बंद झाला. निफ्टीमध्ये पाहता ऑटो निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्प ही सर्वाधिक तेजीसह आघाडीवर राहिली होती. जुलैमध्ये कंपनीने वाहन विक्रीमध्ये 21 टक्के इतकी वाढ नोंदवली होती. या कामगिरीचा परिणाम समभागावरती पाहायला मिळाला. संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्येही खरेदी पाहायला मिळाली.
शेअर बाजारात टाटा स्टील, अदानी पोर्टस, टेक महिंद्रा, टीसीएस, भारती एअरटेल, एचसीएल टेक, ट्रेंट, महिंद्रा आणि महिंद्रा तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग चांगल्या तेजीसमवेत बंद झाले. दुसरीकडे घसरणीमध्ये पाहता पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग मात्र घसरणीत पाहायला मिळाले. जागतिक बाजारामध्ये पाहता आशियाई बाजारामध्ये मिळताजुळता कल दिसून आला. जपानचा निक्केई निर्देशांक 1.67 टक्के घसरणीसोबत व्यवहार करत होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.6 टक्के आणि हॉंगकॉंगचा हँगसेंग 0.28 टक्के इतका घसरणीत होता.









