वृत्तसंस्था/ बालासोर
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला आत्मदहनासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी 4 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. 20 वर्षीय विद्यार्थिनी फकीर मोहन महाविद्यालयात शिकत होती. या विद्यार्थिनीने 12 जुलै रोजी स्वत:वर पेट्रोल ओतत पेटवून घेतले होते. महाविद्यालयात झालेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीला संस्थेच्या अंतर्गत चौकशी समितीने फेटाळले होते असा आरोप या विद्यार्थिनीने केला होता. तर या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ज्योति प्रकाश बिस्वाल सामील असून तो याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तसेच तो आग लावून घेतलेल्या विद्यार्थिनीला वाचविताना होरपळला होता. त्याला अलिकडेच कटक येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. दुसरा आरोपी सुभ्र संभव नायक असून तो एका विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे. तसेच महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका समीरा कुमार साहू आणि माजी प्राचार्य दिलीप घोष यांना विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे.









