वृत्तसंस्था / इंफाळ
134 व्या ड्युरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या ब गटातील सामन्यात डायमंड हार्बर एफसी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना बीएसएफ फुटबॉल क्लबचा 8-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत पूर्ण गुण वसुल केले.
या सामन्यामध्ये डायमंड हार्बर एफसी संघातील ब्राझीलियन स्ट्रायकर क्लेटॉन सिल्वाने 4 गोल नोंदविले. तसेच स्लोव्हेनियाचा फुटबॉलपटू लुका मॅजेसेनने 2 तसेच पॉल आणि जॉबी जस्टीन यांनी प्रत्येकी 1 गोल केला. बीएसएफतर्फे एकमेव गोल 90 व्या मिनिटाला किशोरीने नोंदविला. या विजयामुळे डायमंड हार्बर एफसीने ब गटात आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांनी दोन सामन्यांतून सहा गुण घेतले आहेत. तसेच सरस गोल सरासरीच्या जोरावर त्यांनी आपल्या नजीकच्या संघाला मागे टाकले आहे. आता डायमंड हार्बर आणि मोहन बागान यांच्यातील महत्त्वाची लढत 9 ऑगस्टला होणार आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या फ गटातील सामन्यात भारतीय नौदलाने रियल काश्मिरचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.









