तुरुंगात अमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप फेटाळला
वृत्तसंस्था/ दिब्रूगढ
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत आसामच्या दिब्रूगड तुरुंगात कैद खलिस्तान समर्थक आणि पंजाबच्या खडूरसाहिबचा खासदार अमृतपाल सिंहने स्वत:वर झालेले अमली पदार्थांच्या सेवनाचे आरोप फेटाळले आहेत. अमृतपाल विरेधात कटाच्या अंतर्गत आरोप केले जात आहेत, तो स्वत: डोप टेस्टसाठी तयार असून पंजाब पोलीस कधीही ही चाचणी दिब्रूगढ तुरुंगात करवू शकतात असे अमृतपालचे वकील इमान सिंह खरा यांनी सांगितले आहे.
जे नेते अमृतपालवर अमली पदार्थांच्या सेवनाचे आरोप करत आहेत, त्यांनीही स्वत:ची डोप टेस्ट करवून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर अमृतपाल सिंहने अमली पदार्थांच्या सेवनाचे आरोप म्हणजे राजकीय कट असून हे पूर्ण प्रकरण पंजाबमध्ये उदयास येणाऱ्या शीख नेतृत्वाची गळचेपी करण्याचे असल्याचे म्हटले आहे.
वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह हा पंजाबमधील अजनाला पोलीस स्थानकावर स्वत:च्या समर्थकांसह हल्ला करण्याच्या आरोपामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत एप्रिल 2023 पासून तुरुंगात कैद आहे. दोन वर्षांपर्यंत अमृतपाल 9 सहकाऱ्यांसह दिब्रुगढ तुरुंगात कैद होते, परंतु तीन महिन्यांपूर्वी त्याच्या 9 सहकाऱ्यांवरील राष्ट्रीय सुरक्षा कायदा हटवित त्यांना पंजाबमध्ये हलविण्यात आले आहे. तर अमृतपाल सिंहवरील राष्ट्रीय सुरक्षा कायदा तिसऱ्यांना वाढविण्यात आला आहे.
तुरुंगात अमृतपालकडून नशा : खास सहकारी
अमृतपाल सिंहवर दिब्रूगढ तुरुंगात नशा करण्याचा आरोप झला आहे. काही दिवसांपूर्वी अमृतसर जिल्हा पोलिसांनी अमृतपाल विरोधात न्यायालयात यासंबंधी अहवाल सादर केला. यात अमृतपाल हा दिब्रूगढ तुरुंगात अमली पदार्थांच्या आहारी गेला असल्याची माहिती भगवंत सिंह बाजेकेने दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. भगवंत सिंह हा अमृतपालचा खास सहकारी आहे.
अमृतसरमध्ये सुनावणी स्थानांतरित
पंजाबच्या अजनाला पोलीस स्थानकावरील हल्ल्याच्या अडीच वर्षांनी आता याप्रकरणाची सुनावणी अमृतसरच्या जिल्हा न्यायालयात पार पडणार आहे. हे प्रकरण अजनाला न्यायालयातून अमृतसर येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. अमृतपालच्या 41 सहकाऱ्यांना मागील आठवड्यात अतिरिक्त जिल्हा तसेच सत्र न्यायाधीश परिंदर सिंह यांच्यासमोर हजर करण्यात आले. परंतु दिब्रूगढ तुरुंगात कैद असल्याने अमृतपालला जर करण्यात आले नाही. कारण राष्ट्रीय सुरक्षा कायदा हटविण्यात आल्यावरच अमृतपालला पंजाबमध्ये आणून खटला चालविला जाऊ शकतो.









