एससीओ परिषदेचा मुद्दा : चीनसोबत होतेय चर्चा
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत पाकिस्तानचे सहकारी तुर्किये आणि अझरबैजानला सामील करण्याप्रकरणी भारताने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. सप्टेंबरच्या प्रारंभी होणाऱ्या या शिखर परिषदेत जगभरातील 20 देशांचे प्रमुख सामील होणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही तियानजिनचा दौरा करू शकतात. परंतु दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या या देशांच्या उपस्थितीमुळे एससीच्या उद्देशांना धक्का पोहोचू शकतो असे भारताने परिषदेपूर्वी स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी आता भारत आणि चीन परस्परांमध्ये चर्चा करत आहेत. 22 एप्रिला रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्किये आणि अझरबैजानने पाकिस्तानची पाठराखण केली होती. एकीकडे सर्व मुस्लीम देशांनी दहशतवादी हल्ल्याची निंदा केली, तर तुर्किये आणि अझरबैजानने पाकिस्तानला उघड साथ दिली होती. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतावर पाकिस्तान हा तुर्कियेकडून प्राप्त ड्रोनचा वापर करत होता. तर अझरबैजान पाकिस्तानला राजकीय स्वरुपात पूर्ण साथ देत होता.
मागील महिन्यात विदेशमंत्री एस. जयशंकर हे चीन दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी एससीओ बैठकीदरम्यान दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांना बाजूला करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. एससीओ देशांना मिळून दहशतवाद, फुटिरवाद आणि कट्टरवादाला सामोरे जावे लागणर असल्याचे जयशंकर यांनी म्हटले होते.
शांघाय सहकार्य संघटनेचे 10 पूर्णवेळ सदस्य आहेत, या संघटनेची स्थापना 2001 साली चीनमध्ये झाली होती. प्रथम यात कजाकस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान हे देश सामील होते. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघटनेत सामील झाले. 2021 मध्ये इराणला संघटनेन पूर्ण सदस्याचा दर्जा देण्यात आला. बेलारुसला 10 वा पूर्ण सदस्य म्हणून संघटनेत सामील करण्यात आले. यंदा संवाद भागीदार म्हणून चीनने तुर्किये, अझरबैजान, कंबोडिया, श्रीलंका, नेपाळ, आर्मेनिया, इजिप्त, कतार, सौदी अरेबिया, कुवैत, मालदीव, म्यानमार, बहारीन आणि संयुक्त अरब अमिरातला निमंत्रण दिले आहे.









