मसूर :
निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते. यावर्षीही शिवारातील पक्ष्यांच्या त्रासाने बळीराजा हैराण झाला आहे. पेरणी अथवा टोकणी केलेले बियाणे तसेच उगवून आलेले पिकांचे कोंब पक्षी खात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार असून त्यावर उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतात विविध रंगांच्या कपड्यांच्या चिंध्या अथवा खतांची रिकामी पोती बांधून पक्षापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या अतिपावसाने बळीराजा अगोदरच त्रस्त झालेला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे तसेच पेरणी अथवा टोकणी करता येत नव्हती. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर शेतकऱ्यांनी वापसा आलेल्या शेतामध्ये उर्वरित मशागतीची कामे उरकून घेतली. मशागतीनंतर शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागणीसाठी सरी सोडणे किंवा जिरायती क्षेत्रात पेरणीची कामे उरकून घेतली होती.
मात्र अलिकडे शिवारातील पक्ष्यांच्या त्रासामुळे बळीराजा वैतागला आहे. अनेक शेतकऱ्यांना पक्षांच्या त्रासामुळे आपल्या शेतात दुबार पेरणी अथवा टोकणी करावी लागली आहे. त्याचा परिणाम विविध पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. पेरणी किंवा टोकणी केलेले बियाणे तसेच उगवून आलेले पिकांचे कोंब शिवारातील पक्षी खात असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. पक्ष्यापासून संरक्षण व्हावे तसेच पेरणी केलेली किंवा टोकणी केलेले बियाणे पक्ष्याने खाऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतात कपड्यांच्या विविध रंगाच्या चिंध्या काठीला बांधून शेतात रोवले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी खतांची रिकामी पोती फाडून ती शेतात काठीला बांधून उभी केली आहेत. तरीही पक्ष्यांचा वावर कमी झालेला दिसून येत नाही. त्यामुळे जिराईत शेतीत पेरणी केलेली पिकांची उगवण कमी प्रमाणात झाली आहे. तसेच सरीवर टोकणी केलेले बियाणे ही पक्ष्यांनी खाल्ली आहे. काही शेतकऱ्यांची पेरणी किंवा टोकणी केलेली पिके चांगली उगवण आली होती. मात्र उगवून आलेल्या पिकांचे कॉब पक्षी खात असल्याने मोठे नुकसान झाले आहे.
- संरक्षणासाठी चिंधी
पेरणी व टोकणी केलेल्या शेतातील बियाणे पक्षी मोठ्या प्रमाणावर खात आहेत. तसेच उगवण झालेल्या पिकांचे कोवळे कोंब पक्षी खात असल्याने दुबार पेरणी व टोकणी करावी लागली आहे पक्ष्यापासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी कपड्याच्या विविध रंगांच्या चिंध्या व रिकामी पोती फाडून शेतात अडकवली आहेत.








