मोपा विमानतळ पोलिसांकडून कारवाई
पेडणे : गोवा सरकारने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर पूर्णपणे निर्बंध घातलेले आहेत. जर मूर्ती सापडली तर हस्तकला महामंडळ कारवाई करेल, असा इशारा वेळोवेळी सरकारने दिला होता. त्यानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्तींची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन मोपा पोलिसांनी पकडून त्याच्यावर कारवाई केली. सविस्तर माहितीनुसार 31 जुलै रोजी पत्रादेवी चेकनाक्यावर मोपा विमानतळ पोलिसांनी एमएच 09 ईएम 9366 क्रमांकाचे वाहन रोखले. हे वाहन पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे उल्लंघन करुन प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. श्रीपाद नरेंद्र पाटील (29 वर्षे, रा. जाधववाडी कोल्हापूर महाराष्ट्र) याला पोलिसस्थानकात हजर राहण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. वाहन आणि गणेशमूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चा कलम 15 (1) अंतर्गत मोपा विमानतळ पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.









