महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागातर्फे खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे मागणी
बेळगाव : मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय सेवा मिळाव्यात, तसेच कन्नडसक्ती थांबवून मराठीचा सन्मान करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने खासदार व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी करण्यात आली. यावेळी खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. अलीकडे झालेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर बेळगावमध्ये कन्नडसक्तीचा बडगा उगारण्यात येत आहे. विशेषत: मराठी भाषिक प्रदेशामध्ये आकसाने कन्नडसक्ती राबविली जात आहे. परंतु, मराठी भाषिकांवर होणारी ही सक्ती संविधानातील मूलभूत अधिकारांविरोधातील आहे.
सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे कन्नडसोबत मराठी भाषेलाही स्थान मिळावे, अशी मागणी खासदारांकडे करण्यात आली. युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोवर याचा निकाल लागत नाही तोवर 865 खेड्यांमध्ये कन्नडसक्ती लादू नये. आपण एक लोकप्रतिनिधी आहात, या भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे मराठी भाषेला कुठेही दुय्यम वागणूक मिळणार नाही, याची काळजी आपण घ्यावी, असे त्यांनी सांगितले. खासदार शेट्टर यांनी मराठी भाषिकांचे म्हणणे ऐकून घेत दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नारायण मुचंडीकर, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, चंद्रकांत पाटील, विजय जाधव, रमेश माळवी, अशोक घगवे यांसह इतर उपस्थित होते.
गृहमंत्र्यांसोबत चर्चा करून समन्वय साधा…
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय राखला जावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन वर्षांपूर्वी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची समन्वय समिती नेमण्याची सूचना केली होती. परंतु, अद्याप ही समिती गठीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन ही समिती गठीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे शुभम शेळके यांनी केली.









