अचानक अर्ज प्रक्रियेला प्रारंभ : 300 जागांसाठी भरती, आधीच नावे निश्चित केल्याची चर्चा
बेळगाव : शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील गणेश शंकर यांना देण्यात आला असल्याने 300 सफाई कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर भरती करून घेतली जात आहे. मात्र, या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर, डिप्लोमा, बीकॉम, बीएड, कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा आदी प्रकारच्या पदवीधर उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यामुळे ड्रायव्हर, लोडर्स, हेल्पर, सुपरवायझर अशा कामांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू लागल्याने एक वेगळेच चित्र सामोरे आले आहे. यापूर्वी बेळगाव शहराची स्वच्छता ठेकेदाराकडून केली जात होती. मात्र, संपूर्ण शहरातील 58 प्रभागांचा ठेका बेंगळूर येथील कंपनीला देण्यात आला आहे. सफाई व्यवस्थितरित्या व्हावी, यासाठी कंत्राटी पद्धतीवर 300 कामगारांची भरती करून घेतली जात आहे. यासाठी दहावी किंवा तत्सम दर्जाची पदवी असलेल्यांना संधी मिळते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पदवीधर देखील सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करत असल्याचे सामोरे आले आहे.
पदवीनंतर सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर खासगी नोकरीच्या ठिकाणी पगाराची शाश्वती नसते. त्यामुळे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई कामगार म्हणून काम करण्यास पदवीधर उमेदवार इच्छुक असल्याचे वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. सफाई कामगारांची भरती करून घेताना मॅन्युएल स्कॅव्हेंजर म्हणून ओळखल्या गेलेल्या कुटुंबातील 83 जणांना भरतीत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी सफाई कर्मचारी हितरक्षण समितीच्यावतीने मनपा आयुक्त शुभा बी. यांच्याकडे करण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. पण गुरुवारी जुन्या पोलीस मुख्यालयामधील हॉलमध्ये अचानक भरती प्रक्रिया राबविण्यात आली. याची माहिती सफाई कर्मचारी हितरक्षण समितीला कळविण्यात आली नाही. 300 जणांची नावे आधीच महापालिकेकडून निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या राबविली जाणारी भरती प्रक्रिया केवळ औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे.









