कोल्हापूर / धीरज बरगे :
नांदणी येथील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी सोशल मीडियावर ‘हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी’ मोहीम राबवली आहे. कोल्हापूरचे, पण सध्या नोकरीनिमित्त कॅनडामध्ये असणारे गौरव मुडेकर यांनी कॅनडामधून ही मोहीम सुरु केली आहे. बघता बघता कोल्हापूरसह संपूर्ण देशभरातून या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरुन हत्ती नांदणी मठास परत करण्यासाठी जोरदार मागणी होत आहे.
नांदणीत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ आहे. या मठातील महादेवी हत्तीला मंगळवारी मध्यरात्री ‘वनतारा’मध्ये दाखल करण्यासाठी नेले. गेल्या 35 वर्षांपासून नांदणी परिसरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाल्याने महादेवीला निरोप देण्यासाठी आबालवृद्ध रस्त्यावर उतरले. नांदणीतून सुमारे चार तास माधुरी हत्तीची मिरवणूक काढली. साऱ्या गावाने ढसाढसा रडत माधुरीला निरोप दिला. माधुरीला ‘वनतारा’कडे देण्यास गावकऱ्यांचा विरोध होता, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे काळजावर दगड ठेवत जड अंत:करणाने गावकऱ्यांनी माधुरीला ‘वनतारा’च्या स्वाधीन केले.
माधुरी गुजरातला जाण्याने गहिवरलेले गावकरी दुसऱ्या दिवशीपासूनच आक्रमक झाले. संतप्त गावकऱ्यांनी बॅन जिओ, बॅन रिलायन्स मोहीम हाती घेतली, सोशल मीडियावरुन माधुरी हत्तीच्या मिरवणुकीचे, बॅन जिओ मोहिमेचे व्हिडिओ व्हायरल झाले. यामध्ये माधुरी हत्तीला निरोप देताना आबालवृद्धांचे रडणे पाहून हत्ती आणि गावकऱ्यांचे ऋणानुबंध किती घट्ट होते, याचे दर्शन झाले. हे व्हिडिओ पाहून नेटीझन्समध्येही संताप निर्माण झाला. हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावरुन प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आणि बघता बघता नांदणीकरांना जिल्ह्यासह देशभरातून सपोर्ट मिळायला सुरुवात झाली.
सध्या नोकरीनिमित्त कॅनडास्थित असणारे गौरव मुडेकर यांनी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी सोशल मीडियावर ‘हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी’ मोहीम राबवण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला नेटीझन्समधून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी मोहिमेने गती घेतली. सोशल मीडियावर हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी कमेंटचा पाऊस पडला आणि माधुरी हत्तीला परत करण्याच्या मागणीला बळ मिळाले.
माधुरी हत्तीबाबतच्या नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावनांमुळे याची दखल जिल्ह्यातील नेत्यांनाही घ्यावी लागली. आमदार सतेज पाटील यांनी नांदणी मठाला भेट दिली आणि माधुरी हत्तीसाठी स्वाक्षरीची मोहीम राबवली. माजी खासदार राजू शेट्टींनी माधुरी हत्तीला परत आणणार, अशी भुमिका घेतली. खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन देत नांदणीकरांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. खासदार धैर्यशील माने यांनीही पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यातून शुक्रवारी ‘वनतारा’ची टिम नांदणीत दाखल झाली.
- बॅन जिओ, बॅन रिलायन्स
ब्रिंग बॅक माधुरीसह नांदणीकरांनी बॅन जिओ, बॅन रिलायनस मोहीम गावामध्ये प्रत्यक्षात राबवली. यामध्ये गावकऱ्यांनी जिओचे सीमकार्ड अन्यत्र पोर्ट केले. रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या या निर्णयाला राज्यातून प्रतिसाद मिळाला. सुमारे 12 हजार 500 ग्राहकांनी जिओचे सीम पोर्ट केल्याची चर्चा आहे.








