ज्येष्ठ साहित्यिक रामकृष्ण मराठे यांचे प्रतिपादन : व्यसनमुक्ती दिनाचे आचरण
बेळगाव : अमलीपदार्थ सेवनाने मातीमोल झालेल्या संसाराच्या बचावासाठी व्यसनमुक्त समाज निर्माण करणे गरजेचे असल्याचे ओळखून डॉ. महांत शिवयोगी पुढे आले. व्यसने आपल्या झोळीमध्ये घेऊन समाजाला सन्मार्ग दाखविणारे महांत शिवयोगी राज्य, राष्ट्रच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारुपास आल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रामकृष्ण मराठे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जि. पं., राज्य मद्यपान नियंत्रण मंडळ, माहिती-सार्वजनिक संपर्क खाते, आरोग्य खाते, शिक्षण खाते, कन्नड- सांस्कृतिक खाते, महापालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 रोजी डॉ. महांत शिवयोगी यांच्या जयंतीनिमित्त कुमार गंधर्व रंगमंदिरात व्यसनमुक्ती दिन आचरण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक मराठे बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी अध्यक्षस्थानी होते. डॉ. महांत शिवयोगी यांचा आदर्श आजच्या युवापिढीने घ्यावा. व्यसनापासून दूर राहून सुदृढ राष्ट्र निर्माणसाठी पुढे यावे, असेही मराठे म्हणाले.
व्यसनमुक्त करण्याची जबाबदारी सर्वांची
अध्यक्षस्थानावरून विजयकुमार होनकेरी म्हणाले, समाज व देश उद्ध्वस्त करणारी व्यसने व याविरोधात समाजात जागृती घडविण्याचे कार्य डॉ. महांत शिवयोगींनी केले. व्यसनमुक्त समाज हेच त्यांचे ध्येय होते. समाज व्यसनमुक्त करून सृदृढ घडविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. संजय दोडमनी म्हणाले, व्यसनामुळे शरीर व समाजावर होणाऱ्या वाईट परिणामांबद्दल सांगितले. युवक व्यसनाच्या आहारी जात असून याबद्दल चिंता व्यक्त केली.
उपस्थितांकडून शपथ वदवून घेऊन गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री म्हणाले, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी डॉ.महांत शिवयोगी यांनी भरीव योगदान दिले. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. कार्यक्रमाला कन्नड-सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, माहिती खात्याचे कर्मचारी अनंत पप्पू, विजयकुमार बेटगेरी, एम. एल. जमादार, आशा कार्यकर्त्या, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.









