एसटीच्या नव्या चालकांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम : एचपीसीएल – बीपीसीएल तज्ञांशी करणार सल्लामसलत
बेळगाव : परिवहन मंडळाची बस ही सर्वसामान्यांना परवडणारी व सुरक्षित वाहतूक आहे. यासाठी कर्नाटक परिवहन मंडळ प्रवासी सुरक्षितता आणि परवडणाऱ्या वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. आता मंडळाकडून अपघातमुक्त सेवेसाठी उपाययोजना आखत आहे. नव्याने रुजू झालेल्या चालकांची व्यावसायिकता आणि ड्रायव्हिंग कौशल्ये वाढविण्यासाठी दीर्घकालीन विशेष प्रशिक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक प्रमुख भाग असलेल्या केएसआरटीसी राज्यभर सेवा प्रदान करत आहे. चार परिवहन महामंडळांच्या एकूण 26 हजार बसेस असून दररोज 1.15 कोटी प्रवाशी बसमधून प्रवास करतात. आज बसेसचे एकामागून एक अपघातांच्या घटना घडत आहेत. अपघातांमध्ये परिवन कर्मचारी व जनतेचाही बळी जात आहे. परिवहन मंडळाच्या आकडेवारीनुसार 1 लाख कि.मी.च्या प्रवासामध्ये अपघाताची शक्यता 0.08 टक्के आहे. अपघातांमध्ये वाढ झाल्यामुळे मंडळाला जीवितहानी व कोट्यावधींची वित्तहानीही होत आहे.
ड्रायव्हिंग सुधारुण अपघात कमी करण्याचा हेतू
चारही महामंडळे भरपाईच्या स्वरुपात कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे अपघातांमध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी व खराब बसेसच्या दुरुस्तीचाही खर्च परिवहन मंडळाला सोसावा लागत आहे. अपघातांच्या अनावश्यक खर्चाचा महामंडळांच्या आर्थिक परिस्थितीवरही विपरित परिणाम होत आहे. यामुळे परिवहन महामंडळे या आर्थिक ओझ्याखाली आहे. चालकांचा निष्काळजीपणा, बसेस आणि रस्त्यांची खराब अवस्था व व्यावसायिकतेचा अभाव यामुळे अपघात होत आहेत. चालकांचे ड्रायव्हिंग कौशल्य सुधारुण अपघातांची संख्या शक्यतितकी कमी करण्याचा हेतू आहे.
ड्रायव्हिंग प्रशिक्षण महिना अनिवार्य
यापूर्वी ड्रायव्हर कम ऑपरेटरला एक आठवड्यांचे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जात असे. या मर्यादेत प्रशिक्षण कालावधीत व्यावसायिकता आणि परिपक्वता साध्य करता येणार नाही, हे लक्षात घेऊन केएसआरटीसीने ड्रायव्हिंग प्रशिक्षण कमीतकमी एक महिन्यासाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये 2 हजार नूतन ड्रायव्हर्सना ड्रायव्हर कम ऑपरेटर म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यांच्या ड्रायव्हिंग कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या आधारे त्यांना विविध श्रेणींमध्ये वर्गीकृत करण्यात आले.
एचपीसीएल व बीपीसीएलच्या धर्तीवर मोहीम
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे तेल व गॅस वाहतुकीसाठी सुमारे 24 हजार टँकर आहेत. केएसआरटीच्या तुलनेत एचपीसीएल व बीपीसीएल टँकरचा अपघात दर कमी आहे. यामुळे एचपीसीएल व बीपीसीएल तज्ञांची सल्लामसलत करून केएसआरटीसी चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याची तयारी करण्यात आली आहे. दीर्घकालीन प्रशिक्षणामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होईल, अशी केएसआरटीसीची अपेक्षा आहे.
संवेदनशीलतेचे धडे देणार
या कर्मचाऱ्यांना होळेकर, हासन, चिक्कमंगळूर, मळवल्ली, मालूर येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. डेपो, कार्यशाळा, प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकविण्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना व्यावहारिक क्षेत्रीय अनुभवासाठी विविध मार्गांवर नेण्यात येणार आहे. तसेच कर्तव्य बजावताना जनतेशी सौजन्याने वागावे, यासाठी संवेदनशीलतेचे धडे देण्यात येतील. जेणेकरून वादविवादाच्या घटनाही होणार नाहीत.









