बेळगाव तालुक्यात अधिकाऱ्यांकडून निरीक्षण : दुकानमालकांना सक्त सूचना
बेळगाव : राज्यात युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना युरियाविना पिके वाया जाण्याचा धोका उद्भवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा काळाबाजार होऊ नये व खातांच्या साठ्याचे निरीक्षण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील विविध गावातील खतांची दुकाने व पीकेपीएसना भेटी देऊन खत नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हा कृषी विभाग सतर्क झाले असून खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. यासाठी विविध पथक स्थापन करून खतविक्री दुकाने व पीकेपीएसना भेटी देऊन निरीक्षण करण्यात येत आहे. तसेच खतांचा साठा व विक्री याबाबतची संपूर्ण माहिती देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना आधीच खतांच्या तुटवड्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. यामुळे त्यांना अधिक दराने खतांची विक्री करू नये, अशी सक्त सूचनाही देण्यात आली आहे.
तालुक्यातील सांबरा, निलजी, मारिहाळ, बाळेकुंद्री के. एच., हुदली, खणगाव के. एच., उचगाव आदी गावांना भेटी देऊन निरीक्षण करण्यात आले. तसेच ओपीएस व भौतिक संसाधनांची तपासणी करून खत नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस बजावून ओपीएस व खतसाठा आणि विक्री यांची संपूर्ण माहिती देण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. या निरीक्षणामुळे काळाबाजारावर आळा बसणार असून शेतकऱ्यांना अधिक दराने खतांची विक्री करणाऱ्यांनावरही चाप बसणार आहे.
नॅनो युरियाचा वापर करावा
युरियामुळे जमिनीसह आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळे युरियाचा अतिवापर टाळून शेतकऱ्यांना नॅनो युरियाचा वापर करण्यासाठी खत दुकानदारांनी प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून शेतजमिनीचा पोत अबाधित राहून मानवी आरोग्यही सुरक्षित राहणार आहे. तसेच नॅनो युरियामुळे पिकेही जोमात येतात. यासाठी नॅनो युरियावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. याबाबत जागृती करण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. साहाय्यक कृषी संचालिका मंगला बिरादार यांच्या नेतृत्त्वाखाली एम. एच. पटगुंदी, मंजुनाथ हक्कलदवर, प्रभू डोणी, मल्लेश नाईक आदी अधिकाऱ्यांच्या पथकाने निरीक्षण केले.









