वृत्तसंस्था / दुबई
29 ऑगस्टपासून खेळविण्यात येणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेत पाकिस्तान संघाचा सलामीचा सामना अफगाणबरोबर होणार आहे. या तिरंगी स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात (युएई) हा तिसरा संघ आहे. सदर माहिती आयसीसीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे. त्यामुळे या उपखंडीय संघांमध्ये सरावाकरिता ही तिंरगी टी-20 मालिका आयोजित केली आहे. या तिरंगी स्पर्धेत प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर दोनवेळा लढत देईल. त्यानंतर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 7 सप्टेंबरला खेळविला जाईल.
शारजाच्या क्रिकेट स्टेडियमवर पाक आणि अफगाण या दोन संघामध्ये आतापर्यंत पाचवेळा टी-20 चे सामने खेळविले गेले. त्यामध्ये पाकिस्तानने तीनवेळा तर अफगाणने दोनवेळा विजय नोंदविले आहेत. पाकचा क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत असून या संघांनी विंडीजचा पहिल्या सामन्यात पराभव करत विजयी सलामी दिली आहे. तर बांगलादेश विरुद्धच्या टी-20 मालिकेत पाकला हार पत्करावी लागली आहे. अफगाणने गेल्या डिसेंबरमध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत झिम्बाब्वेचा 2-1 असा पराभव केला होता.
तिरंगी टी-20 मालिकेतील सर्व सामने शारजातील स्टेडियमवर खेळविले जातील. 29 ऑगस्टला अफगाण वि. पाकिस्तान, 30 ऑगस्टला संयुक्त अरब अमिरात वि. पाक, 1 सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरात वि. अफगाण, 2 सप्टेंबरला पाक वि. अफगाण, 4 सप्टेंबरला पाक वि. संयुक्त अरब अमिरात, 5 सप्टेंबरला अफगाण वि. संयुक्त अरब अमिरात, 7 सप्टेंबरला अंतिम सामना होईल.









