विविध देशांमधील संघर्ष थांबविल्याचा दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पाकिस्तान आणि इस्रायलनंतर आता अमेरिकन व्हाईट हाऊसनेही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी आपल्या सध्याच्या कार्यकाळात विविध देशांमधील 6 जागतिक संघर्ष संपवल्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या. ट्रम्प यांनी इस्रायल-इराण, भारत-पाकिस्तान, थायलंड-कंबोडिया, रवांडा-काँगो लोकशाही प्रजासत्ताक, सर्बिया-कोसाव्वो आणि इजिप्त-इथिओपिया यांच्यातील संघर्ष मिटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा लेविट यांनी केला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी स्वत:सुद्धा अनेक संघर्ष सोडवल्याबद्दल आपण नोबेल शांतता पुरस्कारास पात्र असल्याचे वक्तव्य केले होते.
मे महिन्यात भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केला होता. तथापि, भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे.









