पहिली कसोटी, देवॉन कॉन्वे, डॅरियल मिचेल यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/बुलावायो
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी न्यूझीलंडने पहिल्या डावात 7 बाद 294 धावा जमवित झिम्बाब्वेवर 145 धावांची आघाडी मिळविली. देवॉन कॉन्वे आणि डॅरियल मिचेल यांनी अर्धशतके झळकविली. तत्पूर्वी झिम्बाब्वेचा पहिला डाव 149 धावांत आटोपला. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत ही दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या कसोटीत झिम्बाब्वेचा पहिला डाव 149 धावांत आटोपला होता. झिम्बाब्वेच्या डावात कर्णधार एर्विनने 6 चौकारांसह 39, सिगाने 5 चौकारांसह 30 तर वेल्चने 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 39 धावांत 6 गडी बाद केले. तर नाथन स्मिथने 20 धावांत 3 बळी मिळविले. न्यूझीलंडने बिनबाद 92 या धावसंख्येवरुन गुरुवारी दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि उपाहारापर्यंत त्यांनी 52 षटकात 3 बाद 174 धावांपर्यंत मजल मारत झिम्बाब्वेवर 25 धावांची आघाडी मिळविली. यंग आणि कॉन्वे
या सलामीच्या जोडीने 26.1 षटकात 92 धावांची भागिदारी केली. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर न्यूझीलंडने आपला पहिला गडी लवकरच गमविला. मुझारबनीने यंगला झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 41 धावा केल्या. कॉन्वेला निकोल्सने बऱ्यापैकी साथ देताना दुसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. मुझारबनीने निकोल्सला बेनेटकरवी झेलबाद केले. त्याने 6 चौकारांसह 34 धावा जमविल्या. रचिन रविंद्र सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर केवळ दोन धावा जमवित तंबूत परतला. उपाहारावेळी कॉन्वे 87 तर मिचेल 9 धावांवर खेळत होते. 2023 च्या डिसेंबरनंतर निकोल्सची ही पहिलीच कसोटी होती. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला. खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर चिवंगाने कॉन्वेला बेनेटकरवी झेलबाद केले. त्याने 170 चेंडूत 12 चौकारांसह 88 धावा जमविल्या. चिवंगाने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना ब्लंडेलला केवळ 2 धावांवर झेल बाद केले. मुझारबनीने ब्रेसवेलला बाद करुन न्यूझीलंडवर पुन्हा दडपण आणले. ब्रेसवेलने 1 चौकारासह 9 धावा केल्या. एका बाजुने मिचेल संघाची धावसंख्या वाढवत होता. चहापानावेळी न्यूझीलंडने 79 षटकात 7 बाद 254 धावा जमवित झिम्बाब्वेवर 105 धावांची आघाडी मिळविली. मिचेल 48 तर स्मिथ 8 धावांवर खेळत होते.
खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर झिम्बाब्वेने दुसरा नवा चेंडू घेतला. मिचेलने 85 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. व्हिन्सेंट मासेकेसाने सँटेनरला स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपले. त्याने 30 चेंडूत 1 चौकारासह 39 धावा जमविल्या. मिचेल पाच चौकारांसह 73 तर स्मिथ 1 चौकारांसह 22 धावांवर खेळत होते. या जोडीने आठव्या गड्यासाठी अभेद्य 61 धावांची भागिदारी केली होती. झिम्बाब्वेतर्फे मुझारबनीने 73 धावांत 3 तर चिवंगाने 51 धावांत 2 तसेच सिकंदर रझा आणि विन्सेंट मासेकेसा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे प. डाव 60.3 षटकात सर्वबाद 149 (एर्विन 39, सिगा 30, वेल्स 27, हेन्री 6-39, स्मिथ 3-20), न्यूझीलंड प. डाव 92.3 षटकात 7 बाद 294 (कॉन्वे 88, मिचेल खेळत आहे 73, यंग 41, निकोल्स 34, सँटेनर 19, स्मिथ खेळत आहे 22, मुझारबनी 3-73, चिवंगा 2-51)
धावफलक अपूर्ण









