दापोली :
तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाकवली क्र. १ ची केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेच्या देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये निवड झाली आहे. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच याबाबची घोषणा केली. १ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांच्याहस्ते शाळेला रत्नागिरीमध्ये प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
ब्रिटिशकालीन असलेली ही शाळा आधुनिक तंत्रज्ञान व शैक्षणिक सुविधांमुळे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी ही वाकवली शाळा १८९६ साली स्थापन करण्यात आली. शाळेने आधुनिक तंत्रज्ञानासह विविध भौतिक व शैक्षणिक सुविधा उभारत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. डिजिटल क्लासरुम, सीसीटीव्ही, इंटरनेट, आधुनिक ग्रंथालय, सोलर पॅनल, सेल्फी पॉईंट, योगा शिबीर, आर्थिक साक्षरता उपक्रम आणि आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी शाळेत करण्यात आली आहे.
- एकेकाळच्या सुतार शाळेला आज ३९ राष्ट्रीय मानांकने
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित समारंभात केंद्रीय शिक्षण मंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच रत्नागिरी जिल्हधातील १६ शाळांपैकी वाकवली शाळा क्र. १ला सर्वोकृष्ट ‘पीएम श्री म्हणून जाहीर करण्यात आले आहे. केंद्राच्या अंतिम फेरीत वाकवली शाळेने एकूण ३९ मूल्यांकन निकषांवर राष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे. कधी काळी ‘सुतार शाळा’ म्हणून ओळखली जाणारी ही शाळा आज डिजिटल शिक्षणाच्या युगातही स्वतःचं स्थान टिकवून आहे. विद्यार्थ्यांमध्ये कार्यकुशलता, इतिहास व वारसा यांची ओळख आणि जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण यासाठीही शाळा ओळखली जाते.
शाळेला मिळालेल्या या यशामध्ये मुख्याध्यापक जावेद शेख, शिक्षिका निवेदिता सागर आणि ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. या यशाबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नीलेश शेठ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्गेश जाधव, वाकवली सरपंच, उपसरपंच यांच्यास जिल्हाभरातून कौतुक होत आहे.








