गैरकारभार होत असल्याचा रयत महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आरेप : आश्वासनानंतर आंदोलन मागे
वार्ताहर/काकती
काकती ग्राम पंचायतीत अनधिकृत बांधकाम परवाने, सरकारी जमिनी बेकायदेशीर हडप करणाऱ्यांची नोंद करण्यात येवू नये. ‘सकाल’ योजनेंतर्गत घर परवाना, मिळकत नोंदी, संगणकीय उतारा आदी सेवा नागरिकांना वेळेत मिळत नसल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वेळेत कामे होत नसल्याने या कामांत काकती ग्राम पंचायत अपयशी ठरले असल्याचा आरोप कर्नाटक राज्य शेतकरी संघटना महासंघ यांनी केला. या महासंघाच्यावतीने बुधवारी सकाळी 11 वाजता होळी चौक येथून निषेध मोर्चाला प्रारंभ झाला. काकती ग्राम पंचायतसमोर गैरकारभाराच्या घोषणा देत दुपारी 1 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
याप्रसंगी ‘सुवर्णग्रह’ हे अपार्टमेंट तीन मजलीपेक्षा 12 मजली बांधण्यात आल्याचा आक्षेप, गंगेनाळ रोड येथील पॉप्युलर ब्लॉक्स सिमेंट पाईप फॅक्टरीचे सांडपाणी शिवारात मिसळून नदीतील पाण्याचे प्रदूषण, सर्व्हे नं. 86 व 87 या सरकारी जागेबाबत गैरव्यवहार होत आहेत. अशा सरकारी जागेच्या ग्राम पंचायतीतील नोंदी व जागेचे उतारे आमचेकडे त्वरित देण्याची मागणी या रयत महासंघाचे राज्याध्यक्ष बिराप्पा देशनूर, महिला अध्यक्षा महादेवी हुविलगोळ, बसन्नगौडा पाटील, बसवराज मोकाशी, सुरेश वाली आदींनी केली. तालुका निर्देशक अधिकारी व्ही. बी. कडेमनी, ग्राम विकास अधिकारी अरुण नाथबुवा आदींनी संबंधीत व्यवहाराच्या नोंदीची कागदपत्रे, ‘सकाल’ योजनेचा माहिती फलक ग्राम पंचायतीसमोर त्वरित लावण्यात येईल, असे कबूल केले.
कामांची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा
वरील सर्व मागण्यांची अंमलबजावणी त्वरित झाली नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह करण्याचा ठाम निर्धार शेतकरी महासंघाने यावेळी केला. काकती पोलीस स्थानकाचे मंडल पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी मध्यस्थी करून कामाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महासंघाच्या कार्यकर्त्यांना दिले.









