39 हजार कोटी रुपयांचा होणार व्यवहार : व्यवसाय होणार मजबूत
मुंबई :
देशातील ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स इटलीतील ट्रक निर्माती कंपनी इव्हेको खरेदी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. साधारण 39 हजार 245 कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार टाटाकडून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
इव्हेकोचा समूह भारतातील टाटा मोटर्ससोबत व्यावसायिक ट्रक व्यवसाय विक्री संदर्भात चर्चा करत आहे. हा जर व्यवहार पूर्ण झाला तर टाटा मोटर्सचा आजवरचा सर्वात मोठा खरेदी व्यवहार असेल असे म्हटले जात आहे. 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हरची खरेदी टाटाने 2.3 अब्ज डॉलर्समध्ये केली होती. टाटा समूह इव्हेकोचे मालक अग्नेली कुटुंबांकडून 27 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार असल्याचे समजते.
व्यवसाय होणार मजबुत
या व्यवहारानंतर टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन व्यवसायाला अधिक मजबुती प्राप्त होणार आहे. जागतिक स्तरावर पाहता इव्हेकोचा महसूल 74 टक्के इतका युरोपमधून येतो. या तुलनेमध्ये टाटाचा महसूल भारतामधून जवळपास 90 टक्के इतका प्राप्त होतो.
समभागावर परिणाम काय
इव्हेकोची खरेदी करणार असल्याच्या बातमीनंतर टाटा मोटर्सचे समभाग शेअर बाजारामध्ये घसरणीत असलेले पाहायला मिळाले. बुधवारी 30 जुलै रोजी समभाग इंट्रा डेमध्ये जवळपास 3 टक्के इतके घसरणीत राहिले होते.









