रहस्याची उकल करण्यास वैज्ञानिकांना अपयश
जगात बहुतांश लोकांना पुस्तक वाचनाची आवड असते. पुस्तकांच्या वाचनामुळे ज्ञान वाढते आणि नवी-नवी माहिती मिळते. परंतु एका रहस्यमय पुस्तकाचे कोडे वैज्ञानिकांना आजवर सोडविता आलेले नाही. या रहस्यमय पुस्तकाचे नाव वॉयनिच मॅन्युस्क्रिप्ट आहे. या पुस्तकाचे रहस्य दूर करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला, परंतु त्यांना यश मिळू शकले नाही.
या रहस्यमय पुस्तकामध्ये अनेक अलौकिक रहस्य असल्याचे बोलले जाते. स्वत:च्या या अनोखेपणामुळेच वॉयनिच मॅन्युस्क्रिप्ट चर्चेत असते. या पुस्तकात अशी भाषा आहे जी आजवर कुणीच समजू शकलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून या पुस्तकाला डीकोड करण्यास कुणीच यशस्वी ठरलेला नाही. या रहस्यमय पुस्तकात विविध प्रकारची चित्रं दिसून येतात, ज्यात अनेक प्रकारची रोपं आणि फूल आहेत. या रहस्यमय पुस्तकात सुमारे 240 पानं आहेत, परंतु काही पानं गायब आहेत. कार्बन डेटिंगद्वारे या पुस्तकाचे लेखन 1404-1438 दरम्यान करण्यात आले असावे, असे कळले आहे. या पुस्तकातील जी पानं गायब आहेत, त्यात आणखी रहस्यं होती, असे सांगण्यात येते. या पुस्तकाला पोलंड येथे राहणारे अमेरिकन पुरातात्विक पुस्तक विक्रेते विल्फ्रेड एम. वॉयनिच यांनी 1912 मध्ये खरेदी केले होते. त्यांनी हे पुस्तक एका जुन्या पुस्तकांच्या दुकानातून खरेदी केले होते. याचमुळे या पुस्तकाला वॉयनिच मॅन्युस्क्रिप्ट नाव मिळाले आहे.
या पुस्तकाच्या लेखनासाठी एका खास भाषा किंवा लिपीचा वापर करण्यात आला होता, ज्याला आजवर कुणीच समजू शकलेले नाही. यात अशा फूलांच्या चित्रांचा वापर करण्यात आला आहे, जी बहुधा आमच्या पृथ्वीवरच कधीच अस्तित्वात नव्हती. या पुस्तकाचे रहस्य दूर करण्यासाठी अनेक वैज्ञानिक आणि संशोधकांनी ते वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.









