राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संबंधित नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्राची दखल घेण्याच्या पैलूवर राऊस अव्हेन्यू न्यायालय मंगळवारी निकाल देणार आहे. दोन्ही बाजूंच्या दखल घेण्याच्या पैलूवर युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी 15 जुलै रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.
2 जुलैपासून अंमलबजावणी संचालनालय आणि प्रस्तावित आरोपींकडून दखल घेण्याच्या मुद्यावर न्यायालय दररोज युक्तिवाद ऐकत होते. ईडीने काँग्रेसचे दिवंगत पक्षनेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस तसेच सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांच्यावरही आरोप लावले आहेत. तसेच, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या (एजेएल) 2,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या कथित फसवणुकीवरून संपादन केल्याबद्दल यंग इंडियन या खासगी कंपनीवर कट रचण्याचा आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
काँग्रेस पक्षाच्या विरोधात आम्हाला पुरावा आढळला, तर त्या पक्षालाही आरोपी केले जाईल, अशी स्पष्टोक्ती प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) दिल्लीतील न्यायालयात यापूर्वीच दिली आहे. दिल्लीतील विशेष न्यायालय आता या प्रकरणात प्रतिदिन सुनावणी करत असल्यामुळे या प्रकरणात आरोपी असणारे सोनिया गांधी, राहुल गांधी इत्यादी नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.









