वृत्तसंस्था/ बँकॉक
थायलंडची राजधानी असलेले शहर बँकॉक सोमवारी गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले आहे. एका इसमाने बाजारपेठेत उभे राहून अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये आरोपीचाही समावेश आहे. लोकांवर गोळीबार केल्यावर आरोपीने स्वत:वरही गोळी झाडून घेतली होती. यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे थायलंडच्या पोलिसांकडून सांगण्यात आले.
मृतांमध्ये आरोपीसह एकूण 6 जणांचा समावेश आहे. तसेच यात चार सुरक्षारक्षकही सामील आहेत. गोळीबाराची ही घटना बँकॉकच्या ओर टो को बाजारात घडल्याची माहिती बँकॉकचे पोलीस आयुक्त चारिन गोपट्टा यांनी दिली आहे. ही बाजारपेठ धान्य आणि स्थानिक खाद्यपदार्थांसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. तर गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे तातडीने पोहोचले होते. या गोळीबारामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस याप्रकरणी आता विस्तृत तपास करत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये थायलंडमध्ये बंदूक हिंसेच्या घटना वाढल्या आहेत. मे महिन्यात यू थोंग जिल्ह्याच्या बन डॉन उपजिल्ह्यात एका 33 वर्षीय इसमाने केलेल्या गोळीबारात दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. ही घटना वाट यांग सावांग अरोम शाळेपासून 50 मीटर अंतरावर घडली होती.
तर ऑक्टोबर 2023 मध्ये बँकॉकच्या सियाम परागॉन मॉलमध्ये एका 14 वर्षीय मुलाने केलेल्या गोळीबारात 2 जण मृत्युमुखी पडले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. ऑक्टोबर 2022 मध्ये थायलंडच्या एका चाइल्ड केयर सेंटरमध्ये झालेल्या हल्ल्यात 36 जणांचा मृत्यू झाला होता, मृतांमध्ये 24 मुलांचा समावेश होता. हा हल्ला रॉयल थाई पोलीस विभागाच्या एका माजी कर्मचाऱ्याने केला होता, ज्यानंतर त्याने स्वत:ची पत्नी, सावत्र पुत्र आणि स्वत:वरही गोळी झाडून घेतली होती.









