महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे यांचाही समावेश
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या 17 सदस्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. या खासदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते निशिकांत दुबे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. यावेळी पुरस्कार विजेत्या खासदारांमध्ये सर्वाधिक 7 खासदार महाराष्ट्रातले आहेत. 4 संसद सदस्यांना सर्वोत्तम पंच पुरस्कारही देण्यात आला आहे. हे पुरस्कार प्रत्येक वर्षी सक्षम खासदारांना दिले जातात.
सर्वोत्तम पंच पुरस्कारप्राप्त खासदारांची नावे, भार्तृहरी महताब (भारतीय जनता पक्ष), एन. के. प्रेमचंद्रन (क्रांतीकारी समाजवादी पक्ष), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गट) आणि श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट1) अशी आहेत. इतर खासदारांमध्ये स्मिता उदय वाघ (भारतीय जनता पक्ष), नरेश म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस), मेधा कुलकर्णी (भारती जनता पक्ष), तसेच प्रवीण पटेल, विद्युत बरन महातो आणि दिलीप सैकिया या लोकप्रतिनिधींचाही समावेश पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये करण्यात आला आहे. या पुरस्कारांचा प्रारंभ ‘प्राईम फाऊंडेशन आणि डिजिटल नियतकालीन असणाऱ्या ‘प्रेझेन्स’ यांच्याकडून 2010 मध्ये करण्यात आला. दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने या पुरस्काराचा प्रारंभ करण्यात आला होता. आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी हा पुरस्कार पटकाविला असून उत्कृष्ट कामगिरी करुन दाखविली आहे.









