पंचाहत्तर टक्के गुणांसह जगात प्रथम स्थान, तर दुसरा क्रमांक दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जागतिक लोकप्रियता आणि विश्वासाहर्ता सूचीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांना मान्यता श्रेणीत 75 टक्के गुण मिळाले आहेत. दुसरे स्थान दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे मँग यांना मिळाले आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आठव्या स्थानी आहेत.
‘ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल रेटिंग’ या संज्ञेअंतर्गत हे जागतिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ‘मॉर्निंग कन्सल्ट’ नामक अमेरिकास्थित गुप्तचर आणि विदा कंपनीकडून करण्यात आले आहे. ही कंपनी प्रत्येक वर्षी विविध राष्ट्रप्रमुखांच्या लोकप्रियतेचे आणि विश्वासार्हतेचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करत असते.
एक आठवडा सर्वेक्षण
या संस्थेकडून 4 जुलै ते 10 जुलै असे एक आठवडाभर हे सर्वेक्षण केले गेले. विविध देशांमध्ये या संस्थेचे प्रतिनिधी जातात. त्या देशांच्या नागरीकांशी थेट संपर्कक करतात आणि अशा प्रकारे आकडेवारी संकलित करतात. नंतर या माहितीचे विश्लेषण करुन निष्कर्ष काढला जातो. तो प्रसिद्ध केला जातो.
पंतप्रधान मोदी लोकशाहीवादीच
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीची पायमल्ली करीत आहेत. त्यांच्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यांनी लोकशाही बळकट करणाऱ्या अनेक देशांतर्गत संस्थांचे खच्चीकरण चालविले आहे, असे आरोप भारतातील विरोधी पक्षनेते करीत असतात. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकशाही संरक्षक नेते आहेत, असे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यांच्या नेतृत्वात लोकशाहीचे संवर्धन झाले असून या राज्यपद्धतील त्यांच्यापासून कोणातही त्रास नाही, असा नि:संदिग्ध निर्वाळा लोकांनी दिल्याचे हे सर्वेक्षण स्पष्ट करत आहे. त्यांच्या विश्वासार्हतेवर जगातील प्रत्येक चार लोकांपैकी तीन लोक सहमत आहेत, अशी माहिती या सर्वेक्षणाच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीही प्रथम क्रमांक
2024 च्या सर्वेक्षणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात प्रथम क्रमांकावर होते. त्यावेळी त्यांचा गुणांक 69 टक्के इतका होता. यावेळी त्यांच्या लोकप्रियतेत आणि विश्वासार्हतेत अधिकच भर पडली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी दुसरे स्थान मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्र मॅन्युएल लोपाझ यांना मिळाले होते. 2022 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 71 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळाला होता.
मार्क कर्नी यांनाही स्थान
यावर्षीच्या सर्वेक्षणात कॅनडाचे नवनिर्वाचित नेते मार्क कर्नी यांनाही चौथे स्थान मिळाले आहे. तर तिसऱ्या स्थानावर अर्जेंटिनाचे नेते झेवियस मिलेई आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप मात्र आठव्या स्थानावर आहेत. त्यांनी जगात करयुद्धाचा प्रारंभ केला, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या करधोरणामुळे त्यांचा गुणांक घसरला आहे, असेही सर्वेक्षणात दिसून आले आहे.
सातत्यपूर्ण कामगिरी
विश्वासार्ह आणि लोकप्रिय जागतिक नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे जगात कौतुक होत आहे. कोणत्याही अन्य नेत्याने इतके सातत्य दाखविलेले नाही, ही बाबही स्पष्टपणे समोर आली आहे. भारतात तर त्यांना अधिक गुण स्वाभाविकच मिळाले आहेत, पण अन्य देशांमध्येही त्यांचे रेटिंग स्थानिक राष्ट्रप्रमुखापेक्षाही अधिक आहे, असे आढळले आहे. भारतीय जनता पक्षाने या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे स्वागत केले असून विरोधी पक्ष नेत्यांच्या आरोपांना परस्परच उत्तर मिळाले आहे, असे प्रतिपादन केले आहे.
पंतप्रधान मोदी : लोकप्रियतेत वाढ
ड गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत पंतप्रधान मोदी अधिक लोकप्रिय
ड अनेक जागतिक नेत्यांना टाकले मागे, भारतात सर्वाधिक लोकप्रिय
ड भारताप्रमाणे इतर देशांमध्येही त्यांच्या विश्वासार्हतेत झाली मोठी वाढ
ड पंतप्रधान मोदी यांच्या लोकशाहीसंवर्धनावर बहुसंख्य लोकांचा विश्वास









