पाचगणी :
जावळी तालुक्यातील महू धरणाच्या भिंतीवर वाढलेलं काटेरी जंगल व झाडाझुडपं आता धरणाच्या अस्तित्वालाच धोका ठरत आहेत. १९९६ साली सुरू झालेलं हे धरण अजूनही पूर्ण झालेलं नाही व आता या धरणाच्या भिंतीवर बाबळी, लिंब व इतर काटेरी झाडांचा विळखा बसला आहे.
या झाडांचेमुळे भिंतीमध्ये खोलवर जाऊन भिंतीला तडे जाऊ शकतात. भविष्यात धरणातून गळती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
३० वर्षांचा ‘कामचुकार’ इतिहास ! महू धरणाची उभारणी १९९६ साली ६३ कोटींच्या अंदाजपत्रकावर सुरू झाली होती. मात्र आज, २०२५ मध्येही हे धरण पूर्णत्वाला पोहोचलेले नाही. दरम्यान, खर्चाचा आकडा तब्बल ७०० कोटींच्या वर पोहोचला आहे.
या धरणामुळे जवळपास ५,००० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती, असा दावा केला गेला होता. पण वास्तव काय? आजही या धरणाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेलं नाही.
कधी झाडं, कधी फायली, आणि कायम दुर्लक्ष… एवढ्या मोठ्या प्रकल्पावर एवढी बेफिकीरी कशी?
स्थानिक नागरिकांनी अनेकदा झाडं हटवण्याची, संरक्षक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र त्याकडे सरळ दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जातो धरण बनवलं, पण पाणी नाही; आणि आता तेच धरण तुटण्याच्या वाटेवर!” धरण उभारणीचा उद्देशच जर अपूर्ण असेल, आणि आता त्याच धरणाच्या भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण होत असेल, तर हा संपूर्ण प्रकल्प म्हणजे एक अपयशाचं प्रतीकच ठरत आहे.
धरणाच्या भिंतीवर काटेरी झाडं वाढतील आणि अधिकारी शांत बसतील, हे कसं चालेल? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
- तुरंत झाडाझुडपं काढा, अन्यथा मोठी दुर्घटना होईल !
धरणाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने झाडं व झुडपं काढावीत, भिंतीची मजबुती तपासावी, आणि लवकरात लवकर धरण पूर्णत्वास नेऊन पाणी शेतक्रयांपर्यंत पोहोचवावं, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे धरणाच्या भिंतीवर जंगल उगवतंय, आणि प्रशासन झोपलंय…. ही अवस्था बदलणं अत्यावश्यक आहे. अन्यथा हे धरण भविष्यात धोक्याचं ठिकाण ठरेल, आणि त्याचं उत्तरदायित्व संपूर्णपणे प्रशासनावर असेल, हे विसरू नये. – अविनाश दुर्गवळे, मनसे तालुका अध्यक्ष.
- जंगल वाढलं, अधिकारी झोपले !
या धरणाच्या भिंतीवर वाढलेल्या जंगलाकडे कृष्णा पाटबंधारे विभाग, सातारा यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून अजिबात लक्ष दिलं गेलेलं नाही. जंगल मोठं झालं… धरण धोक्यात आलं… आणि तरीही अधिकारी शांत!








