वाठार किरोली :
रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील पत्नीच्या पोटात चाकू भोसकून तिला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येथील जमीर नबीलाल मुलाणी याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत रहिमतपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रहिमतपूर येथील राधाकृष्ण गल्लीतील जमीर नबीलाल मुलाणी हा वारंवार दारू पिऊन पत्नी सौ. रुक्साना व मुलांना मारहाण करत होता. दि. 22 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला व त्याने रागाच्या भरात पत्नीच्या पोटात चाकू भोसकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाकूने भोसकल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला त्याच अवस्थेत सोडून तो पळून गेला होता.
या घटनेची माहिती रहिमतपूर पोलीस स्टेशनला मिळताच जखमी रुक्साना मुलाणी यांचा जबाब नोंदवून, पती जमीर मुलाणी याच्याविरुध्द रहिमतपूर पोलीस ठाण्यात जिवे मारण्याच्या प्रयत्नाबाबत गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनेनंतर जमीर मुलाणी पसार झाला होता. रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवून जमीर मुलाणी याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस ठाणे हद्दीतील गावात असे कृत्य घडल्यास महिलांनी कोणत्याही दबावास बळी न पडता तक्रार नोंदवावी, असे आवाहन स.पो.नि. सचिन कांडगे यांनी केले आहे.








