चौकडीला अटक, पावणे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत : खडेबाजार पोलिसांची कारवाई
बेळगाव : नशामुक्त बेळगावसाठी पोलिसांनी अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या व त्याचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. गांजा, हेरॉईन पाठोपाठ पाऊण किलो चरस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या चौकडीकडून 4 लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरदार्स हायस्कूल मैदानाजवळ चरस विकताना छापा टाकून चौघा जणांना अटक केली आहे.
त्या सर्व चौघा जणांविरुद्ध अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अझहर मोहद जाहीद (वय 27), मूळचा राहणार कोंडली राजवीर कॉलनी, पूर्व दिल्ली, सध्या राहणार सुभाषनगर, इब्राहिम अब्दुलखादर घीवाले (वय 24), राहणार सदाशिवनगर, दानिश खान युसुफखान कित्तूर (वय 27), मूळचा राहणार फोंडा गोवा, सध्या राहणार नानावाडी, सुनील शिवानंद संगनायकर (वय 22), राहणार हनुमाननगर अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत.
सरदार्स हायस्कूल मैदानाजवळ चरस विकण्यात येत असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून सुमारे 4 लाख रुपये किमतीचा 825 ग्रॅम चरस, प्रत्येकी 20 हजार रुपये किमतीचे दोन आयफोन, विवो व वनप्लसचे दोन असे एकूण चार मोबाईल संच, डीएल 13 एक्स 1762 क्रमांकाची हिरोहोंडा मोटारसायकल, केए 23 ईएल 2335 क्रमांकाची डिओ असा एकूण 4 लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गांजा, हेरॉईन पाठोपाठ पोलिसांनी चरसही जप्त केले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बेळगावला नशामुक्त बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार कोणत्याही परिस्थितीत अमलीपदार्थांची विक्री व त्याचे सेवन खपवून घेणार नाही, अशी स्पष्ट सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे शहरातील बहुतेक पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे.









