कोल्हापूर / इंद्रजीत गडकरी :
शहरात गांजाच्या व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. विशेष म्हणजे, या नशेसाठी ‘रिजला पेपर‘चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. एक काळ होता, जेव्हा रिजला पेपर फक्त सिगारेट रोलिंगसाठी वापरले जात होते; मात्र आता हे पेपर्स गांजा ओढण्यासाठी ‘फॅशनेबल माध्यम‘ ठरत आहेत.
रिजला पेपर हे बाजारात विविध फ्लेवरसह उपलब्ध असून, त्याची किंमत 200 ते 500 रुपये दरम्यान असते. स्ट्रॉबेरी, मिंट, चॉकलेट, व्हॅनिला यांसारखे फ्लेवर असलेल्या या पेपरमुळे तरुणांना गांजा ओढताना ‘नवीन चव‘ अनुभवायला मिळते, असे काहीजणांचं म्हणणं आहे. अजून चिंतेची बाब म्हणजे हे पेपर आता फक्त पानटप्रयांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. अनेक स्टेशनरी आणि जनरल स्टोअर्समध्येही हे सहज मिळतात. विक्रेत्यांना यामध्ये सरासरी 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळतो, त्यामुळे अनेक दुकानांमध्ये ते खुलेपणाने विकले जातात.
- रिजला पेपरला ऑनलाईनही मागणी
ऑनलाईन बाजारही मोठा हा पेपर जसा पानटपऱ्या, स्टेशनरीमध्ये मिळतो तसा तो ऑनलाईन बाजारतही मिळतो कॉलेजच्या तरूणांमध्ये ऑनलाईन खरेदीचे प्रमाणही मोठे आहे. गांजा आणि रिजला पेपरचा वापर करण्राया तरुणांमध्ये कॉलेज विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिसतात. मैत्रीच्या ग्रुपमध्ये, फेस्टिवल दरम्यान किंवा रात्रपार्टीमध्ये याचा सर्रास वापर होत असल्याचं चित्र समोर आलं आहे.
- आरोग्यावर गंभीर परिणाम
गांजा ओढल्यामुळे फुफ्फुसांचे विकार, स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक अस्थैर्य, चिडचिड, निर्णयक्षमतेचा अभाव यांसारखे परिणाम दिसून येतात. त्यातच फ्लेवरयुक्त पेपरमुळे केमिकलचा अतिरिक्त मारा शरीरावर होतो.
-डॉ. अनिता सैबिनवार, सीपीआर ऊग्णालय, कोल्हापूर
- पोलीस प्रशासन सजग
कोल्हापूर पोलिसांनी काही ठिकाणी झडती दरम्यान तरुणांकडून गांजासह रिजला पेपरही जप्त केले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “आता गांजा थेट ओढण्याऐवजी तरुण रिजला पेपर वापरून ‘रोल‘ करून पितात. त्यामुळे गांजा झटकन ओळखता येत नाही. ही पद्धत गुन्हेगारीत ‘कव्हर अप‘ म्हणून वापरली जाते.“
- समाजानेही यावे पूढे
या गंभीर परिस्थितीवर केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नाही. पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांनी तरुणांमध्ये गांजाचे दुष्परिणाम स्पष्ट करणे गरजेचे आहे. महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्तीविषयक चर्चासत्रं, जागरूकता शिबिरं घेणे, समाजमाध्यमांतून जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. गांजा हे ‘कूल‘ नाही, तर आरोग्य आणि करिअर दोघांनाही घातक आहे, हे तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान आता समाजासमोर उभं आहे.
- रिजला पेपर म्हणजे काय ?
रिजला पेपर एक प्रसिद्ध ब्रँड आहे जो सिगारेट रोलिंग पेपर्स बनवतो. या ब्रँडची सुरुवात 1680 च्या आसपास फ्रान्समध्ये झाली होती. रिजला हे नाव रीज (फ्रेंचमध्ये तांदूळ) आणि ला (लॅक्रॉईझ कुटुंबाचे नाव) यांच्या संयोगाने बनले आहे.
या पेपरचा वापर मूळत: तंबाखू रोल करून सिगारेटसारखा धूर घेण्यासाठी केला जातो. मात्र अलीकडे या पेपरचा गांजा, चरस, हॅश यांसारख्या नशेसाठी वापर वाढला आहे.
- आरोग्याला धोका :
-फ्लेवरसाठी वापरले जाणारे केमिकल्स
-धुरामुळे फुफ्फुसांचे नुकसान
-गांजासोबत घेतल्यास मनोविकार
- कायदेशीर बाजू :
-भारतात गांजा बाळगणे/सेवन करणे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा
-पेपरला बंदी नाही, पण वापराच्या हेतूप्रती संशय
- मनोवैज्ञानिक प्रभाव :
आनंदी वाटणं, मग चिडचिड, नैराश्य नंतर तीव्र व्यसन








