आमदारांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ : तालुक्यातील गावागावांत टप्प्याटप्प्याने योजना राबविणार
खानापूर : काहीवर्षापूर्वी तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर होती. मात्र अलीकडे वेगवेगळ्या योजनांमुळे गावागावात पाण्याची सोय झालेली आहे. आता गावागावांमध्ये नळपाणीपुरवठा योजनेद्वारे चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. घराघरात पाण्याची मुबलक उपलब्धता झाली असली तरी भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने पाणी जपून आणि आवश्यक तेवढे वापरावे, पाण्याचा वापर कमीतकमी कसा होईल, याचेही नियोजन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बरगाव येथे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त पेले.
यावेळी पाणीपुरवठा योजनाधिकारी रमेश मेत्री, ग्रा. पं. अध्यक्षा चांगुणा पाटील, सदस्य पद्मश्री पाटील, भाऊ पाटील, महांतेश पाटील, उपाध्यक्ष गोविंद पाटील यासह अभियंते, ग्रा. पं. सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात जलजीवन मिशन, ग्रामीण पेयजल योजना यांच्या माध्यमातून बरगाव, भंडरगाळी येथे चोवीस तास पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याची सुरुवात बरगाव ग्रा. पं. च्या माध्यमातून करण्यात आली असून यापुढे बरगाव, भंडरगाळी येथे चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने तालुक्यात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रमेश मेत्री यांनी यावेळी सांगितले.









