वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी सराव आणि पूर्वतयारीकरिता हॉकी इंडियाने भारतीय पुरुष हॉकी संघासाठी ऑस्ट्रेलिया दौरा आयोजित केला आहे. भारतीय हॉकी संघ 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर चार सामन्यांची हॉकी कसोटी मालिका खेळणार आहे.
हॉकीच्या मानांकनात भारत आठव्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर आहे. या दोन संघातील हे चारही सामने पर्थमध्ये 15, 16, 19 आणि 21 ऑगस्ट रोजी खेळविले जातील. आगामी आशिया चषक हॉकी स्पर्धा बिहारमधील राजगीर येथे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे. आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा संघ पुढील वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेड पात्र ठरेल. युरोपच्या दौऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये अलिकडे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची प्रो लीग हॉकी स्पर्धेतील लढत झाली होती. उभय संघातील झालेल्या दोन्ही टप्प्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 3-2 असा विजय मिळविला होता. गेल्या वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर 3-2 अशा गोलफरकाने विजय मिळविला होता. 1972 च्या म्युनिच ऑलिम्पिकनंतर भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर मिळविलेला हा पहिला विजय होता. 2013 पासून या दोन संघामध्ये झालेल्या 51 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 35 सामने तर भारताने 9 सामने जिंकले आहेत. उर्वरित सात सामने अनिर्णीत राहिले.









