बहुतांश भुदरगडवासीयांनी देखील ही बंदिस्त खोली पाहिलेली नाही
By : अनिल कामीरकर
गारगोटी : सात हुतात्म्यांचा धगधगता इतिहास असलेले भुदरगडचे तहसीलदार कार्यालय जमीनदोस्त करण्यात आली. ज्या खोलीतून गोळीबार केला. ती खोली मात्र पाडलेली नाही. त्याचे स्मारक केले जाणार असून बहुतांश भुदरगडवासीयांनी देखील ही बंदिस्त खोली पाहिलेली नाही.
इमारत पाडल्यामुळे ही ऐतिहासिक खोली लोकांना पहावयास मिळत आहे. संपूर्ण भुदरगड तालुक्यातील शेतसारा तहसीलदार कार्यालयात जमा होत होता आणि त्याला संरक्षण देण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला जात होता. स्वातंत्रसैनिकांनी ही ट्रेझरी फोडण्याचे नियोजन केले होते.
त्यानुसार स्वातंत्र्य सैनिकांनी भुदरगड तहसीलदार कार्यालयावर हल्ला चढवला होता. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला तो याच खोलीच्या छोट्या खिडकीतून. गोळ्या कुठून येतात याचा अंदाज न आल्याने सात स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य पत्कारावे लागले.
तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला. आता जुनी इमारत पाडण्यात आली आहे. जुनी इमारत स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक म्हणून जतन करावी याकरिता आंदोलन उभारले गेले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रतिसाद न देता जुनी खोली (कस्टडी) संरक्षित केली आहे.
सदर खोली स्मारक म्हणून विकसीत केली जाणार असून त्याकरिता वेगळा आराखडा बनवण्यात येणार आहे. जेणे करुन स्वातंत्र्य इतिहास पाहण्यासाठी आलेल्या लोकांना त्याची माहिती होईल.








