महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ : समिती नगरसेवकांचा मराठी बाणा
बेळगाव : महापालिकेतील कानडीकरणाला जोरदार विरोध करण्यासह सर्वसाधारण सभेची नोटीस मराठी भाषेतून देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. मात्र या मागणीला सत्ताधारी नगरसेवकांसह सरकारनियुक्त सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने महापालिकेत गदारोळ झाला. त्यामुळे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांनी सभात्याग केला. त्यानंतर महापौर मंगेश पवार यांनी काहीवेळासाठी सभा तहकूब केली. महापालिकेत सर्वत्र कानडीकरण करण्यात येत असल्याने मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनीदेखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत गुरुवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत मराठीच्या मुद्द्यावरून आवाज उठविण्यासह महापौर व अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसाधारण बैठकीला सुरुवात होताच नगरसेवक रवी साळुंखे व त्यांचे सहकारी आपल्या आसनावरून उभे राहिले. उच्च न्यायालयाने मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेतून सरकारी परिपत्रके देण्याचा आदेश दिला आहे. इतकेच नव्हेतर भाषिक अल्पसंख्याक आयोगानेही मराठी भाषेतून सरकारी परिपत्रके देण्याची सूचना केली आहे. पण या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या भाषेतून सर्वसाधारण सभेची नोटीस देण्यात यावी, महापालिकेत सुरू असलेले कानडीकरण थांबवावे, अशी जोरदार मागणी म. ए. समितीच्या नगरसेवकांनी लावून धरली.
या मागणीमुळे बिथरलेल्या विरोधी गटातील नगरसेवकांनी व सरकारनियुक्त सदस्यांनी आक्षेप घेत म. ए. समितीच्या नगरसेवकांना घेरण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात राहायचे असेल तर कन्नड शिकलेच पाहिजे, मराठी हवे असेल तर तुम्ही महाराष्ट्रात जा, असे म्हणत विरोधी व सरकारी सदस्यांनी घोषणाबाजी करत मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. विरोधी गटात अनेक मराठीभाषिक नगरसेवक आहेत. मात्र त्यांनीदेखील यावेळी मराठीच्या बाजूने कोणत्याही प्रकारे आवाज उठविला नाही. उलट मराठीला विरोध करणाऱ्यांच्या सुरात सूर मिसळला. सभा सुरू झाल्यानंतर 12.30 च्या दरम्यान म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी सभात्याग केला. गदारोळ निर्माण झाल्याने महापौर मंगेश पवार यांनी सभा तहकूब केली. यानंतर पुन्हा अर्धातासाने म्हणजेच दुपारी 1 च्या दरम्यान सभेला पुन्हा सुरुवात झाली. म. ए. समितीच्या नगरसेवकांनी कन्नडसक्ती विरोधात व मराठीसाठी सभागृहात आवाज उठविल्याने सीमावासियांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
म्हणे, कारवाई करा…
म. ए. समितीच्या नगरसेवकांनी कानडीकरण आणि मराठी कागदपत्रांच्या विषयांवर बोलण्यासाठी महापौर मंगेश पवार यांच्याकडून परवानगी घेतली होती. मात्र सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाली यांनी रवी साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बोलण्यावरून आक्षेप घेतला. महापालिका कायदा 81 नुसार सभागृहात कसे वागले पाहिजे, याबाबत कायदा अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर मनपा कायदा 89 नुसार रवी साळुंखे यांना निलंबितदेखील करता येऊ शकते. महापौरांनी याबाबत कारवाई केली पाहिजे, पण असो. यापुढे असा प्रकार घडल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी काहींनी सभागृहात केली.









