चेन्नई पोलिसांची कारवाई : बनावट कंपन्यांच्या नावे खाते उघडून देऊन केली मदत
बेळगाव : सायबर गुन्हेगारांना मदत करण्यासाठी बोगस करंट अकाउंट उघडणाऱ्या बेळगाव येथील तीन तरुणांना तामिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करून चेन्नईला नेण्यात आले आहे. बेळगाव येथील सायबर क्राईम विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी या कारवाईची खातरजमा केली आहे. अनिल कोल्हापूरे रा. कुवेंपूनगर, रोहन कांबळे रा. गणेशपूर, सर्वेश किवी रा. आरपीडी क्रॉस अशी त्यांची नावे आहेत. तामिळनाडूत त्यांच्यावर 27 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चेन्नई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
यापूर्वीही मंगळूर येथील सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायबर गुन्हेगारांना मदत केल्याच्या आरोपावरून बेळगाव येथील तीन तरुणांना अटक केली होती. आता चेन्नई पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले असून तुमकूरमध्येही या त्रिकुटावर फसवणुकीचे गुन्हे आहेत. चेन्नई येथील एसीपी प्रियदर्शनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगावात येऊन त्रिकुटाला ताब्यात घेतले आहे. येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर करून ट्रांझिट वॉरंट घेऊन त्यांना चेन्नईला नेण्यात आले आहे. या तिघा जणांनी दोन बनावट कंपन्या उघडून त्या कंपन्यांच्या नावे बँकेत करंट अकाउंट सुरू केले होते.
खरेतर हे अकाउंट सायबर गुन्हेगारांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आले होते. या अकाउंटवर होणाऱ्या एकूण व्यवहारावर त्यांना कमिशन दिले जात होते. कमिशनच्या आशेला बळी पडून या तरुणांनी सायबर गुन्हेगारांना मदत केली आहे. अशा प्रकारात बँक खाते उघडून देणारे सहजपणे पोलिसांच्या जाळ्यात सापडतात. मात्र त्यांना खाते उघडण्यास सांगणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे तपास अधिकाऱ्यांना कठीण जाते.
सावधगिरी बाळगावी…
सायबर गुन्हेगारांविषयी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर येणाऱ्या अनावश्यक लिंकवर क्लिक करू नये, गुन्हेगार कोणालाही फसवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. कमिशनच्या आशेने खाते उघडून देणारे सहजपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे कोणासाठीही बँक खाते उघडताना विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.









