महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत चर्चेचे गुऱ्हाळ : वेगवेगळ्या विषयांवरून अधिकारी धारेवर : चार महिन्यात 48 कोटी रुपयांचा महसूल जमा
बेळगाव : गोडसेवाडी येथे सिंगल लेआऊट देण्यात आलेले 14 पीआयडी टिळकवाडी क्लब, भूभाडे वसुली, कचरा, बांधकाम परवाने आदी विषयांवर महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत जोरदार चर्चा केली. विविध विषयांवरून सत्ताधारी विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनादेखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण बैठकीचे आयोजन केले होते. राज्यगीताने बैठकीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच मराठीच्या विषयांवरून सभागृहात जोरदार हंगामा झाला. काहीवेळानंतर परिस्थिती निवळली.
त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांना चर्चेला घेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. सुरुवातीलाच गोडसेवाडी येथील सिंगल ले आऊटमध्ये देण्यात आलेल्या 14 पीआयडी क्रमांकाचा विषय कुठंपर्यंत पोहोचला याबाबतची विचारणा सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली यांनी केली. त्यावेळी कायदा अधिकारी जिगऱ्याळकर यांनी महापालिकेकडून सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर न्यायालयात केव्हिट दाखल केले आहे. नगरसेवक पेडणेकर यांनी टिळकवाडी क्लबसंदर्भात विचारणा केली. त्यावेळी टिळकवाडी क्लबबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. संबंधितांना नोटीस देऊन चौकशीला नेण्याबाबत सूचना केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महसूल खात्याचे अधिकारी घरपट्टी वसूल करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
टिळकवाडी क्लबबाबत प्रक्रिया सुरू
एक ते दोन कोटी कर थकीत होईपर्यंत अधिकारी का गप्प रहात आहेत. असे झाल्यास महापालिकेचे कामकाज कसे करायचे, असा खडा सवाल उपस्थित केला. महसूल विभागाकडून चालू आर्थिक वर्षाच्या तीन महिन्यात किती महसूल गोळा करण्यात आला आहे, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांनी चालू वर्षाच्या चार महिन्यात 48 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असल्याची माहिती सभागृहाला दिली.
मनपाकडील 768 कूपनलिका लवकरच एलअँडटीकडे हस्तांतर करणार
विरोधी गटातील नगरसेवक शाहीदखान पठाण यांनी फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांकडून भूभाडे वसूल करण्याच्या ठेक्याबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी म्हणाल्या, भूभाडे वसुलीचा ठेका यापूर्वी किशोर मोदगेकर यांना दिला होता. अलीकडेच मागविण्यात आलेल्या ई-निविदेत सर्वाधिक 1 कोटी 23 लाख 68 हजार रुपयांची बोली लावल्याने किशोर मोदगेकर यांना भूभाडे वसुलीचा ठेका देण्यात आला आहे, असे सांगितले. भूभाड्यासाठी 10 रुपयाऐवजी काही ठिकाणी 20 ते 50 रुपये आकारले जात आहेत. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
काही प्रभागांमध्ये विकासकामे होत नाहीत. मात्र कूपनलिकेच्या दुरुस्तीसाठी 90 लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याने याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणीही करण्यात आली. महापालिकेकडे 768 कूपनलिका आहेत. त्या लवकरच एलअँडटीकडे हस्तांतर केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. शहरातील गटारी व कचरा समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक 7 मध्ये केलेल्या घराच्या बांधकामामुळे गटारींचे नुकसान झाले आहे.
तसेच काहीनी सेटबॅकदेखील सोडले नाही. याकडे मनपाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी केली. गणेशपूर रोडवरील विनायकनगर येथे अपार्टमेंट बांधण्यासाठी तळमजल्याचे खोदकाम करण्यात आले. मात्र सदर ख•dयात पाणी तुंबले असल्याने आजूबाजूच्या घरांना तडे जात आहेत. याबाबत तक्रार करून कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यावेळी नगररचना अधिकारी वाहिद अख्तर हे उत्तर देताना म्हणाले. विनायकनगर येथे सुरू असलेले बेकायदा बांधकाम रोखण्यात आले आहे. घरांना धोका पोहोचत असल्यास याबाबत पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करावा. तुंबलेले पाणी काढण्याची व्यवस्था केली जाईल, असे म्हणाले.
बेळगाव वन केंद्रात ई आस्थीसाठीच्या अर्जाचा स्वीकार
गोडसेवाडी येथील लोटस काउंटीमध्ये नाल्यावर अतिक्रमण करून स्लॅब घातले जात आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक आनंद चव्हाण यांनी केली. महापालिकेकडे 1 लाख 20 हजार ए खात्यासाठी आलेले अर्ज बाकी आहे, असे मनपा आयुक्तांनी सांगितले. बेळगाव वन केंद्रात ई आस्थीसाठी अर्ज स्वीकारले जात असले तरी, प्रत्यक्षात अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता. त्याठिकाणी कर्मचारी व अधिकारी अर्ज घेण्यास तयार नाहीत. एका पेपरच्या स्कॅनिंगसाठी 10 रुपयांची मागणी केली जात आहे, असा आरोप नगरसेवक नितीन जाधव यांनी केला. त्यावर सर्व बेळगाव वन पेंद्रातील ऑपरेटर्सना ई आस्थीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर क्रिएटर लॉगिंग देखील देण्यात आले असल्याचे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी स्पष्ट केले.









