भारतीय लोकमानसात ‘गिधाड’ या पक्ष्याला एकेकाळी रामायण महाकाव्यात येणाऱ्या जटायुच्या कथेमुळे आदराचे स्थान लाभलेले आहे परंतु असे असले तरी साहित्यातल्या प्रचलित संकल्पनांनी गिधाडाविषयी गैरसमज निर्माण केलेले आहेत. त्यामुळे आज संकटग्रस्त ठरलेल्या या पक्ष्याची संख्या बेदखल ठरली होती. गुरा-ढोरांना वेदनामुक्त करण्यासाठी ज्या डायक्लोफिनॅक औषधाचा वापर व्हायचा, त्यामुळे अशा मृत जनावरांचे मांस खाऊन मुत्राशय निकामी होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या गिधाडाविषयी खूप कमीजणांना माहिती होती.
रावण सीतेला जेव्हा पळवून लंकेत नेत होता तेव्हा रावणाला रोखण्यासाठी जटायूने त्याच्याशी लढा दिला परंतु त्यात तो अपयशी ठरला. मरणासन्न अवस्थेत त्याने सीतेचा शोध घेणाऱ्या श्रीरामाला सीताहरणाची माहिती देऊन प्राण सोडला. त्याच्या या कार्यामुळे जटायुचे नाव लोकमानसात वंदनीय ठरले परंतु गिधाडाचा आकार, त्याची चोच आणि एकंदर रंगरुप यामुळे त्याच्याविषयी असलेले गैरसमज, त्यांच्या विलक्षण गतीने घटणाऱ्या संख्येविषयी प्रदीर्घकाळ समाजात त्यांच्या सद्यस्थिती संदर्भात जागृती करण्यास कारणीभूत ठरले. एकेकाळी मृत्युमुखी पडणाऱ्या पाळीव आणि अन्य जनावरांचे मांस फस्त करून परिसराला दुर्गंधीपासून वाचविण्याबरोबर स्वच्छ ठेवण्यात गिधाडे महत्त्वाचे योगदान देत होती.
गुरांना जडणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी पशुवैद्यक शास्त्राने डायक्लोफिनॅकचा वापर मोठ्या प्रमाणात प्रचलित केला परंतु अशी जनावरे कालांतराने मृत झाल्यावर त्यांचे मांस भक्षण केलेली गिधाडे मुत्राशय निकामी होऊन झपाट्याने मृत्युमुखी पडत गेली. 1980 साली 40,000 दशलक्ष संख्या असलेल्या गिधाडांची संख्या 1990 साली चार दशलक्ष झाली. पुढच्या दशकात त्यांची संख्या भारतात केवळ 40,000 झाल्याकारणाने भारत सरकारने 2006 साली डायक्लोफिनॅकच्या वापरावरती बंदी घातली. जगभरात गिधाडाच्या 23 प्रजाती आढळत असून भारतात त्यातल्या नऊ प्रजाती आढळत होत्या परंतु गुरा-ढोरांसाठी औषध म्हणून डायक्लोफिनॅकचा वाढता वापर, जंगलतोडीमुळे अधिवासाच्या दृष्टीने दुर्मीळ होत चाललेले महाकाय वृक्ष आणि खाद्यान्नाचा होणारा तुटवडा यामुळे गिधाडांच्या चार प्रजाती अतिसंकटग्रस्त श्रेणीत पोहोचल्या. त्यामुळे पांढऱ्या पाठीचे, लांब चोचीचे, बारीक चोचीच्या गिधाडांच्या खालावणाऱ्या संख्येच्या संदर्भात भारत सरकारने संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न आरंभले. लाल डोक्याचे आणि इजिप्शियन गिधाडांचे संवर्धन महत्त्वाचे असल्याची बाब सरकारच्या लक्षात आली.
ऐसेक्लोफिनक आणि केटोप्रोफेन त्याचप्रमाणे अन्य औषधे जनावरांच्या उपचारासाठी वापरात आणताना सरकारी यंत्रणेला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली. झपाट्याने खालावणाऱ्या गिधाडांच्या संख्येचा विषय जेव्हा वन्यजीव मंडळाच्या बैठकीसमोर चर्चेला आला आणि त्यामुळे गिधाड संवर्धन कृती आराखडा (2020 -25) कार्यान्वित होऊन त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यांत गिधाडांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले. हरयाणा वन खाते आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गिधाड संवर्धन केंद्र सुरू करण्यात आले आणि त्याला लोकसहभागाची जोड देण्यात आल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिह्यात ‘सिस्केप’ संस्थेतर्फे प्रेमसागर मेस्त्राrने चिरगाव येथे गिधाडांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी लोकसहभागातून प्रयत्नपूर्वक मोहीम यशस्वीपणे राबविली आणि त्याला भापट आणि म्हसाळा या गावांतही चांगला प्रतिसाद लाभला.
प्रेमसागर मेस्त्राr यांनी गावात एकेकाळी महाकाय वृक्षांवर घरटी करून राहणाऱ्या गिधाडांना पाहिले होते. एखादे पाळीव जनावर मृत झाल्यावर त्याला काही क्षणात फस्त करून, परिसराला घाण, अनारोग्य आणि दुर्गंधी यापासून मुक्त करणाऱ्या गिधाडांचे योगदान बालपणापासून जंगले, दऱ्याखोऱ्यांत भटकंती करताना, त्याने अनुभवले होते. आकस्मिकपणे गिधाडे परिसरातून नामशेष झाल्याने, त्यांचे खाद्यान्न आणि नैसर्गिक अधिवास असुरक्षित झाल्याची प्रकर्षाने जाणीव झाली होती आणि त्यासाठी त्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी त्याने शास्त्राrय अभ्यास करून कारणमीमांसा जाणून घेतल्यानंतर लोकसहभागातून गिधाडे वाचविण्याची आणि पुनऊत्थान करण्याची चळवळ आरंभली.
गिधाडांची सद्यस्थिती आणि त्यांची घटणारी संख्या त्याच्यासमोर आव्हान होते आणि त्यासाठी आपल्या संस्थेमार्फत गिधाडांच्या निवासासाठी महाकाय वृक्ष सुरक्षित राहतील आणि त्यांना आवश्यक खाद्यान्नांची प्राप्ती होईल, याखातर कटाक्षाने नियोजनबद्ध प्रयत्न आरंभले आणि त्याचे चांगले परिणाम चिरगावला दिसून आले. चिरगाव, श्रीवर्धन, म्हसाळा आदी परिसरात जेव्हा गिधाडांचे सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा त्यांची संख्या केवळ 22 असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यासाठी सिस्केप संस्थेच्या माध्यमातून गिधाडांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जे प्रयत्न यशस्वी झाले, त्यातून त्यांची संख्या 350 वर पोहोचली.
गिधाडे मांसाहारी पक्षी असून मृत जनावरांचे मांस आपल्या तीक्ष्ण, टोकदार चोचीने तुकडे करून खाण्याचे कौशल्य या पक्ष्याकडे असल्याने निसर्गातील अन्न साखळीतला ‘स्वच्छता दूत’ म्हणून महत्त्वाचा दुवा ठरलेला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे अनाहुतपणे काम करणारा हा पक्षी आपल्या पिसे नसलेल्या देहामुळे आणि अणकुचीदार चोचीमुळे भयानक दिसत असला तरी प्रत्यक्षात हा पक्षी मानवी समाजाचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी ‘स्वच्छता दूत’ या नात्याने महत्त्वाचे योगदान देत आला आहे. त्यामुळे जगातल्या काही संस्कृतीत त्याला देवतास्वरुप मानलेले आहे. प्राचीन इजिप्तमध्ये गिधाड ऊपातल्या नेखबेत देवतेला वंदनीय मानले होते. लॅटिन अमेरिकेतल्या पेरू देशातील नायका पठारावरती काँडॉरच्या गिधाड देवता स्वरुप महाकाय आकृत्या आढळलेल्या आहेत.
रामायण काळात जटायुने सीताहरण रोखण्यासाठी रावणाशी संघर्ष केल्याने समस्त गिधाड प्रजातीला एकेकाळी आदराचे स्थान लाभले होते. परंतु आज पक्षी आणि प्राणी यांचे अस्तित्व राखून ठेवण्याची समाजातील सौहार्दाची आणि समन्वयाची भूमिका झपाट्याने विस्कळीत होत असून त्यामुळे गोव्यासारख्या म्हादईच्या जंगलातून गिधाडे नामशेष झाली, त्याची दखल ना वन खात्याने ना सरकारने घेतली. त्यामुळे लांब चोचीच्या आणि पांढऱ्या पाठीच्या गिधाडांच्या प्रजातींची संख्या घसरणीवर जाऊन त्यांची सद्यस्थिती कशी, काय आहे, याविषयी माहिती उपलब्ध नाही. गोव्यासारख्या साक्षरतेच्या दृष्टीने अग्रक्रमी असणाऱ्या राज्यातली ही बाब धक्कादायक आहे.
– राजेंद्र पां. केरकर








