बेळगाव-चोर्ला मार्गावर किणयेनजीक अपघात : एक किरकोळ जखमी
वार्ताहर/किणये
बेळगावहून बेळगाव-चोर्लामार्गे भाजीपाला घेऊन जात असलेल्या गुड्स कँटरने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात कँटरमधील बिजगर्णी गावचा तरुण जागीच ठार झाला तर अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे. मधु कल्लाप्पा अष्टेकर (वय 40) रा. बिजगर्णी असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. कँटर चालक शुभम नागेश चौगुले (रा. सावगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री 10.35 वाजता बेळगाव-चोर्ला मार्गावर किणये नजीक झाला आहे. याबाबत बिजगर्णीतील स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, सावगाव येथील शुभम चौगुले हा चालक व बिजगर्णी येथील मधु अष्टेकर हे वाहक कॅन्टरमधून बेळगाव येथून गोव्याला भाजीपाला घेऊन जात होते.
बेळगाव-चोर्ला रोडवर किणये गावाजवळील रिजेंटा हॉटेलच्या काही अंतरावरील मुख्य रस्त्याच्या बाजूला एक ट्रक थांबला होता. बेळगावहून येणाऱ्या कँटर चालकाला थांबलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रकला जोराची धडक दिली. यामध्ये वाहक मधु अष्टेकर हा जागीच ठार झाले तर चालक शुभम चौगुले हा किरकोळ जखमी झाला. अपघात इतका भयानक होता की ट्रकला जोराची धडक दिल्यामुळे कँटरचा समोरील भाग चक्काचुर झाला. या अपघातात मधु अष्टेकर यांच्या छातीला व डोक्याला जबर मार बसला होता. सदर ट्रक हा नादुरूस्त असल्याने दोन दिवसांपासून त्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला थांबलेला होता, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे.
ट्रकवर ताडपत्री झाकण्यात आली होती. इंडीकेटर न लावता ट्रक उभा करण्यात आल्याने कँटरची पाठीमागून धडक बसून हा अपघात घडला. ट्रकचा पाठीमागील भाग समोरून येणाऱ्या कँटर चालकाच्या निदर्शनास न आल्यामुळेच हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अपघाताची माहिती बिजगर्णी गावातील मधू अष्टेकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे वडील व भाऊ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी वडगाव ग्रामीण पोलीस दाखल झाले. मधु हे कँटरमध्ये अडकून होते. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर मधु अष्टेकर यांना कॅन्टरमधून बाहेर वाढण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आला. या अपघाताबाबत मधु यांच्या पत्नीने वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद नोंद केली आहे. उत्तरीय तपासणीनंतर मधू अष्टेकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बिजगर्णी येथे बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधु यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलग्गी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे.









