बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण : उद्योगपती शिरीष गोगटे यांचा 75 वा वाढदिवस उत्साहात
बेळगाव : बॅडमिंटन खेळाच्या समान आवडीमुळे शिरीष गोगटे व मी एकत्र आलो. 60-70 च्या दशकांमध्ये हा खेळ फारसा लोकप्रिय नव्हता. सर्व खेळाडू फक्त बेंगळूरमधूनच येत असत. मात्र, त्या काळात शिरीष गोगटेंसह बेळगावने अनेक खेळाडू दिले. तुलनेत बेळगावमध्ये त्यावेळी फारशा सुविधा नव्हत्या. तरीही शिरीषने बॅडमिंटनमध्ये उत्तम प्रगती केली. बॅडमिंटनने आम्हाला जवळ आणले, पण त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वाने आमच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ असे स्नेहबंध निर्माण झाले. ते आजही तसेच आहेत, अशा भावना पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केल्या.
बेळगावचे उद्योगपती शिरीष गोगटे यांचा 75 वा वाढदिवस बेळगाव स्पोर्ट्स क्लब व बेळगाव बॉडीबिल्डर्स असोसिएशन यांच्यावतीने नर्तकी चित्रपटगृहात बुधवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, आशा कोरे, रोहिणी गोगटे, उज्ज्वला पदुकोण, डॉ. किरण ठाकुर व अविनाश पोतदार उपस्थित होते. अविनाश यांनी डॉ. कोरे, डॉ. ठाकुर यांचा परिचय करून देऊन स्वागत केले.
प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रकाश पदुकोण यांचा परिचय उमा शेट्टी यांनी करून दिला. त्यानंतर रूपा व अविनाश पोतदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा परिचय करून देऊन त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन उमा शेट्टी यांनी केले. शिरीष गोगटे यांच्यावरील माहितीपट दाखविण्यात आला. आचार्य संजीव वाळवेकर यांनी आशीर्वचन केले. आयोजक संस्थांतर्फे व्यासपीठावरील सर्वांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश पदुकोण यांनी शिरीष गोगटे व आपल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. शिरीष अतिशय साधा, विनयशील आणि मैत्रीचे महत्त्व जाणणारा आहे. असे सांगतानाच बेळगावचे लोक आतिथ्यशील असून बेळगावने चांगले खेळाडू दिले, असे सांगितले.
डॉ. कोरे यांनी, शिरीष म्हणजे अजातशत्रू असून त्यांनी जर सराव कायम ठेवला असता तर तेसुद्धा राष्ट्रीय पातळीवरील अव्वल खेळाडू म्हणून नावारुपाला आले असते, असे सांगितले. बेळगावचे खेळाडू आज जागतिक पातळीवर चमकत असून पदुकोण यांनी बेळगावमध्ये ट्रेनिंग अकॅडमी सुरू करावी, आपण त्यासाठी सर्व ते सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. किरण ठाकुर यांनी गुरुवार पेठ ही नेत्यांची, बुधवार पेठ कारखानदारांची व मंगळवार पेठ व्यापाऱ्यांची गणली जाते असे सांगून पोतदार व गोगटे कुटुंबीयांचे अनेक वर्षांचे घरोब्याचे संबंध असून शिरीषमध्ये आईचा ठामपणा व वडिलांचा उद्यमशील संस्कार आलेला आहे. त्याचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व सर्वांनाच आपलेसे करते, असे नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना शिरीष गोगटे म्हणाले, आज मी भारावून गेलो आहे. मागे पाहताना मला असे वाटते की, जीवन म्हणजे चढउतार असणारच. जीवनामध्ये संकटे येतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला धडा मिळतो. चुकीचे निर्णय अनुभव देतात आणि अनुभवच आपल्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवितात. मैत्री हे असे नाते आहे की जेथे गुणदोषांसह स्वीकार हा नियम असतो. माझ्या वडिलांनी उद्योगाचा व आईने आत्मविश्वास आणि ठामपणाचा पाया घातला म्हणून आम्ही प्रगती करू शकलो. या प्रवासात माझ्या कुटुंबीयांचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद गाडगीळ यांनी केले.









