जि. पं. सीईओ राहुल शिंदे : मजलट्टी महाविद्यालयाला भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण हा महत्त्वाचा टप्पा असून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून पालकांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केले. शिंदे यांनी मंगळवार दि. 22 रोजी मजलट्टी (ता. चिकोडी) येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. मजलट्टी महाविद्यालयाचा निकाल पाहता विद्यार्थी हुशार असल्याचे दिसून येते. निकाल उत्तम लागण्यासाठी परिश्रम घेतलेल्या प्राध्यापकांचे त्यांनी अभिनंदन केले. यावर्षी मजलट्टी व बैलहोंगल तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयआयटीचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू आहे. प्रत्येक वर्गासाठी 40 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यावयाचे असल्यास पालकांकडून संमतीपत्र दाखल करावे, अशी सूचना शिंदे यांनी केली. विद्यार्थी सौजन्य कुंभार याने मनोगत व्यक्त केले. सीईटी प्रशिक्षण आम्हाला फारच उपयोगी ठरले. प्रश्नांना कसे उत्तर द्यावे हे आम्हाला प्रशिक्षणातून समजून आले. ऑनलाईन क्लासमध्ये पीपीटीद्वारे आम्हाला केलेले मार्गदर्शन उपयोगी ठरल्याचे सौजन्य म्हणाला.
विकासकामांचा आढावा
त्यानंतर, जि. पं. सीईओ शिंदे यांनी चिकोडी तालुका पंचायत सभागृहात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. जनतेची सेवा समजून अधिकाऱ्यांनी काम करावे. कोणतीही तक्रार येऊ नये याची दखल घेऊन काम करीत राहावे. तक्रार आली तरी त्याचे वेळेत निवारण करावे, अशी सूचना केली. यावेळी शिंदे यांनी ठेकेदारांच्या समस्याही जाणून घेतल्या. बेडकीहाळ व शमनेवाडी येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. बेडकीहाळ येथील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळेलाही भेट दिली. कारदगा, मांगूर, बारवाड व बेनाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजना कामाची पाहणी शिंदे यांनी केली. ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण खात्याचे इ.इ. प्रवीण मठपती, पंचायतराज इंजिनिअरिंग विभागाचे इ.इ. पांडुरंग राव, एइइ बिडी नायकवाडी, निपाणी तालुका पंचायत इओ प्रवीण कट्टी, साहाय्यक संचालक शिवानंद शिरगांवे, सुदीप चौगुले, एस. एस. मठद, तालुका पंचायत व्यवस्थापक उदयगौडा पाटील, आयइसी संयोजक रणजीत कर्णिक, शशिकांत जोरे, प्रशासकीय साहाय्यक अक्षय ठक्कप्पगोळ आदी यावेळी उपस्थित होते.









