जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये राबवणार योजना : रोहयो अंतर्गत 63 कामे करण्यात येणार
बेळगाव : लागवड योग्य व सुपीक शेतजमिनीत जिल्ह्यातील नापीक जमिनींचे रुपांतर करण्याची योजना जिल्हा पंचायतीच्यावतीने आखण्यात आली आहे. रोहयोअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 40 ते 50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ही योजना जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून, यामधील काही तालुक्यांमध्ये काम सुरू झाले आहे तर काही तालुक्यांमध्ये शेतजमिनीत पुराचे पाणी व ओलावा असल्याने सुरू करण्यात आलेले नाही. या योजनेंतर्गत एकूण 304.55 हेक्टरमध्ये काम करण्याचे नियोजन आहे. मलप्रभा, घटप्रभा, कृष्णा, दूधगंगा नदीच्या खोऱ्यातील नापीक जमिनीतील गवताळ प्रदेश, जेथे मातीची धूप होऊन जवळपास 19 टक्के जमीन सुपीक तर उर्वरित जमीन नापीक बनली आहे. क्षारपड झालेली शेती, अनेक ठिकाणी नद्या, ओढे आणि कालव्यांमधून जास्त पाणी आल्याने जमीन शेतीसाठी अयोग्य बनली आहे, अशा जमिनींचा शोध घेऊन सुपीक बनविण्यात येणार आहे. रोहयोअंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना सुपीक जमीन बनवून देणार
शेतजमीन नापीक बनल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी जि. पं. च्या पुढाकाराने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक बनल्या आहेत, तेथे रोहयोअंतर्गत काम करून शेतकऱ्यांना सुपीक जमीन बनवून देण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना सोयीचे होणार असून, याद्वारे त्यांचे आपल्यासह कुटुंबीयांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
कामे सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची मदत हवी
कामासाठी अथणी, कागवाड, मुडलगी, गोकाक, चिकोडी, हुक्केरी, रायबाग या 7 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. रोहयाअंतर्गत 63 कामे करण्यात येणार असून 22 कामे विविध तालुक्यांमध्ये सुरू झाली आहेत. काही तालुक्यांत अद्याप पुराचे पाणी आहे तर काही ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याने कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. पण लवकरच कामे सुरू करण्यात येणार असून यासाठी शेतकऱ्यांचीही मदत घेण्यात येणार आहे.
नापीक जमीन सुपीक केल्यास मोठा फायदा
जि. पं. ने रोहयोअंतर्गत पाण्याखाली गेलेल्या किंवा कमी वापरात असलेल्या जमिनींना पुन्हा सुपीक बनविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. नापीक जमिनीचे सुपीक जमिनीत रुपांतर केल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. यासाठी जि. पं. कडून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात हा प्रकल्प यशस्वीपणे राबविल्यास बेळगाव जि. पं. राज्यात एक आदर्श ठरणार असून कौतुकास पात्र होणार आहे.









