पाठ्यापुस्तकांमध्ये बदलाचे केले समर्थन : भौतिकवादामुळे जगात वाढला असंतोष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणजेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाठ्यापुस्तकांमध्ये बदलाच्या मुद्द्याचे समर्थन पेले आहे. भारताला योग्य स्वरुपात समजून घेण्याची आणि सादर करण्याची आवश्यकता आहे. सध्या जो इतिहास शिकविला जातो, तो पाश्चिमात्य दृष्टीकोनातून लिहिला गेला आहे. पाश्चिमात्यांच्या विचारांमध्ये भारताचे कुठलेच अस्तित्व नाही. जागतिक नकाशावर भारत दिसतो, परंतु पाश्चिमात्यांच्या विचारसरणीत नाही. पाश्चिमात्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांत चीन आणि जपान मिळतील, परंतु भारत आढळून येणार नसल्याचे वक्तव्य भागवत यांनी केले आहे.
पहिल्या महायुद्धानंतर शांततेबद्दल बोलले गेले, पुस्तके लिहिली गेली आणि राष्ट्रसंघ (लीग ऑफ नेशन्स) स्थापन करण्यात आला तरीही दुसरे महायुद्ध झाले. मग संयुक्त राष्ट्रसंघ निर्माण झाला, तरीही सध्या तिसरे महायुद्ध होण्याबद्दल लोक चिंतेत आहेत असे उद्गार सरसंघचालक भागवत यांनी काढले आहेत. जगाला आता एक नव्या दिशेची गरज असून ही दिशा भारतीयत्वातूनच मिळणार असल्याचा दावा भागवत यांनी दिल्लीत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि अखिल भारतीय अणुव्रत न्यासाच्या कार्यक्रमात बोलताना केला आहे.
जग भारताकडे पाहतेय
भौतिकवादामुळे पूर्ण जगात अशांतता, असंतोष आणि संघर्ष वाढला आहे. मागील 2 हजार वर्षांमध्ये पाश्चिमात्य विचारसरणीच्या आधारावर माणसाला सुखी आणि संतुष्ट करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. आता जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे. विज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीमुळे लोकांच्या जीवनात भौतिक सुविधा वाढल्या, परंतु दु:ख कमी झाले नाही. चैनीच्या वस्तू आल्या, परंतु मानसिक वेदना दूर झाली नाही. गरीबी आणि शोषण वाढले. गरीब-श्रीमंतांमधील दरी आणखी रुंदावल्याचे भागवत म्हणाले.
भारतीयत्व केवळ नागरिकत्व नव्हे
भारताच अर्थ केवळ कुठल्याही भौगोलिक सीमेत राहणे किंवा नागरिकत्व मिळविणे नाही. भारतीयत्व एक दृष्टीकोन असून तो पूर्ण जीवनाच्या कल्याणाचा विचार राखणारा आहे. धर्मावर आधारित हा दृष्टीकोन धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाला जीवनाचा हिस्सा मानतो. यात मोक्ष अंतिम लक्ष्य असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
भारत एकेकाळी सर्वात समृद्ध
धर्माच्या याच जीवनदृष्टीमुळे भारत कधीकाळी जगातील सर्वात समृद्ध देश होता. आजही पूर्ण जग भारत मार्ग दाखवेल अशी अपेक्षा करत आहे. याचमुळे आम्हाल स्वत:ला आणि स्वत:च्या राष्ट्राला तयार करावे लागणार आहे. सुरुवात स्वत:पासून आणि स्वत:च्या परिवारापासून व्हायला हवी. स्वत:च्या दैनंदिन जीवनात भारतीय दृष्टीकोनाचे पालन करत आहोत की नाही याचे आत्ममंथन लोकांनी करायला हवे असे म्हणत भागवत यांनी सुधार आणि बदलासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.









