वडूज :
खटाव तालुक्यातील चितळी गावातील शेतकऱ्यांची तब्बल 12 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या दोन ऊसतोड मुकादमांना वडूज पोलिसांनी शिताफीने अटक केली. चितळी येथील शेतकरी गणपत भगवान पवार व धर्मराज आबासो पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान मच्छिंद्र शिवदास माने (रा. भूम, जि. धाराशिव) व सचिन भानुदास जाधव (रा. कोळेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी 2023 मध्ये शेतकऱ्यांना 12 कोयत्यांची ऊसतोडणी टोळी देण्याचे आमिष दाखवले. आमिष दाखवून फिर्यादींकडून एकूण 12 लाख 70 हजार रुपये उकळले. मात्र पैसे घेतल्यानंतर त्यांनी कोणतेही ऊसतोड मजूर न पाठवता पैसे परत न करता विश्वासघात करत फसवणूक केली.
या प्रकरणी 5 नोव्हेंबर 2024 रोजी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित सतत मोबाईल क्रमांक व राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा मिळत नव्हता.
पोलीस निरीक्षक घन:श्याम सोनवणे यांनी गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून संशयितांची माहिती मिळवून तपासाचा वेग वाढवला. त्यानुसार संशयित 21 जुलै 2025 रोजी धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या गावी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी टीम तयार करून सापळा रचला.
हवालदार नानासाहेब कारंडे, अमोल चव्हाण, नाईक प्रविण सानप, वरिष्ठ हवालदार बापू शिंदे यांच्यासह तपास पथक भूम व कोळेगाव येथे रवाना झाले. त्यांनी गोपनीय पद्धतीने सापळा रचून दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक निरीक्षक विक्रांत पाटील, हवालदार आनंदा गंबरे, वरिष्ठ हवालदार प्रदीप भोसले, अजित काळे, संदीप खाडे, प्रियंका सजगणे यांचाही सहभाग होता.








