राज्यात यलो अलर्ट जारी
पणजी : राज्यात मुसळधार पाऊस चालूच असून आजही गोव्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. पुढील सहा दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आषाढाच्या सुऊवातीला पावसाने थोडा जोर लावला, मात्र नंतर जोर ओसरला. आता आषाढाच्या अखेरीला मुसळधार पाऊस सर्वत्र कोसळत आहे. शुक्रवारपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून त्याचा गोव्याच्या किनारी भागाला परिणाम जाणवत आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात ढगांनी दाटी केली असून आगामी 24 तासात मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज आहे.
गोव्यात गेल्या 24 तासात सरासरी अडीच इंच पाऊस झालेला आहे, तर मोसमातील एकंदर पाऊस आता 68 इंच झालेला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी तो जादा आहे. मागील 24 तासात म्हापशात सर्वाधिक चार इंच, सांगे, पणजी आणि पेडणे येथे प्रत्येकी तीन इंच, जुने गोवेत अडीच इंच, दाबोळी सव्वा दोन इंच, सांखळी दोन इंच, धारबांदोडा येथे पावणे दोन इंच, काणकोण येथे पावणे दोन इंच, फोंडा दीड तर मुरगाव दीड इंच, अशी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात सर्वाधिक पावसाची नोंद धारबांदोडा येथे झाली असून तिथे आतापर्यंत 95.50 इंच पाऊस झाला. आज व उद्या या ठिकाणी इंचाचे शतक होईल. सांगे येथे 92 इंच, वाळपई येथे 85. 50 इंच पाऊस झाला आहे. केपे 85.25 इंच पाऊस पडला. पणजीत आतापर्यंत केवळ 58.50 पावसाची नोंद झाली आहे.









