गोजगे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन
वार्ताहर/उचगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने गरज आहे. आपण स्वत: कष्टमय जीवन जगून संपूर्ण देशाला त्यांनी आदर्श राज्यघटना दिली. त्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा आणि जीवनात यशस्वी आणि मोठे व्हा, असा मौलिक सल्ला कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला. गोजगे येथील आंबेडकर गल्लीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन नुकतेच लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडला. या भूमिपूजन समारंभप्रसंगी बोलताना त्यांनी मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या की, महिलांना अनेक प्रकारच्या स्वातंत्र्याची संधी दिलेले डॉ. बाबासाहेब हे आधुनिक बसवण्णा असल्याचे सांगितले. पुढील पिढीसाठी डॉ. आंबेडकर यांचे जीवन आदर्श ठरण्याच्या उद्देशाने त्यांचे पुतळे उभारण्यासह आंबेडकर भवन निर्माण करण्यात येत आहे. आपल्या मुलांना अशा महान व्यक्तींचे आदर्श नेहमी शिकवणे गरजेचे असून त्यांचा आदर्श अंगी बाळगावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, महेश कांबळे, शिवाजी यळगे, पद्मराज पाटील, कलाप्पा कांबळे, परशराम नाईक, ललिता पाटील, पीडीओ जबंगी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.









